राफेल प्रकरणी पुनर्विचार याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्ट तयार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सुप्रीम कोर्टाने १४ डिसेंबर २०१८ रोजी दिलेल्या निकालात राफेल करारात सरकारच्या निर्णय प्रक्रियेत त्रुटी आढळलेल्या नाही, असे सांगत या कराराच्या चौकशीची मागणी फेटाळली होती. परंतु मोदी सरकारला क्लीन चिट देणाऱ्या या निकालासंदर्भात दाखल झालेल्या पुर्नविचार याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने तयारी दर्शवली आहे.

 

फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या कराराच्या न्यायालयीन चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या होत्या. त्यावर सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई, न्या. एस के कौल, न्या. के एम जोसेफ यांच्या खंडपीठाने 14 डिसेंबर 2018 रोजी या याचिकांवर निर्णय देत मोदी सरकारला क्लीन चीट दिली होती. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाविरोधात प्रशांत भूषण आणि अन्य दोघांनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. गुरुवारी प्रशांत भूषण यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना पुनर्विचार याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती केली. यावर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी लवकरच पुनर्विचार याचिकेवर सुनावणी घेतली जाईल, असे आश्वासन दिले. आता पुनर्विचार याचिकेवर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे राफेल प्रकरणी अनेक दिवसापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहे.

Add Comment

Protected Content