एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा सर्वसामन्यांना फटका

जळगाव प्रतिनिधी । गेल्या महिनाभरापासून एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला असल्याने विद्यार्थी, सर्वसामान्य कामगार, शासकिय खाजगी नोकरदारांना त्याचा फटका बसत असून त्यांना अडचणींना सामना करावा लागत आहे.

एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे ग्रामीण व शहरी भागाशी दळणवळणाचं माध्यम असलेल्या बसची चाके थांबली आहेत. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कोरोना संसर्गाच्या महामारीतून बाहेर आल्यानंतर शाळा व महाविद्यालये जेमतेम सुरू करण्यात आले होते. त्यातच एसटीच्या महिनाभरापासून सुरू असलेल्या संपामुळे पुन्हा खंड पडत आहे.

जळगाव मुख्य पोस्ट कार्यालयाचे अधिक्षक डॉ.बी.एच.नागरगोजे यांनी यावेळी बसच्या संपावर आपल्या भावंना व्यक्त केल्या ते म्हणाले, “विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातून शाळा महाविद्यालयात उपस्थित रहाण्यासाठी मिळेल त्या वाहनात स्वतःला कोंबून घेत प्रसंगी लोंबकळत प्रवास करावा लागत आहे. अशीच परिस्थिती सरकारी, खाजगी व अन्य ठिकाणी कर्मचारीवर्गाची असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच सद्यस्थितीत मोबाईल व्हॉटस अपमुळे संदेशवहन व्यवस्था असली सार्वजनिक टपाल वितरण व्यवस्थेवर देखिल परिणाम झाला आहे.”

यापुढे व्यक्त होतांना ते म्हणाले, “यात पूर्वीप्रमाणे १५ पैशांचे कार्ड, आंतरदेशीय, पाकीटांव्दारे सुख-दुःखाचे वर्तमान मिळत नसले तरी नोकरीच्या संधी असलेले वा अन्य प्रकारचे टपाल इच्छितस्थळी पोचण्यास कमालीचा विलंब लागत आहे. जिल्ह्यात जळगाव आणि भुसावळ असे दोन विभागात टपाल वितरण कार्यालयांचे कामकाज असून जळगाव विभागात ८ तालुकास्तरावर टपाल विभागाची ४२ कार्यालये असून २५४ उपशाखा आहेत. गेल्या महिनाभरापासून विलीनीकरणाच्या मागणीवरून एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू असल्याने टपाल व्यवस्थेत अडथळे निर्माण झाले. बसमार्गावर असणारी व्यवस्था काहीशी कोलमडली आहे. ग्रामीण भागात टपाल पोचवण्यासाठी खासगी वाहन भाडेतत्वावर घेतले असून दर एक दिवसाआड टपाल रवाना केले जात आहे. यामुळे टपाल खर्चात काही प्रमाणात निश्‍चितच वाढ झाली आहे. न्यायालयीन वा सरकारी टपाल अडकून राहिल्याने अनेकांची कामे खोळंबली आहेत. दरम्यान काही गावातील टपाल वितरण करणारे कर्मचारी स्वत:हूनही दुचाकीवरून प्राधान्याने संबंधितांपर्यत पोचवित आहेत.”

भुसावळ पोस्ट विभाग विभागाच्या सहायक अधिक्षक शितल म्हस्के व्यक्त होतांना म्हणाल्या, “भुसावळ विभागात मध्य रेल्वेमार्गावर असलेला भागात ७ तालुके ३४ पोस्ट कार्यालये व २०४ शाखांतून कामकाज केले जाते. एसटी कर्मचार्‍यांचा संप एक दोन दिवसांत मिटेल असे वाटले होते. परंतु पाच दिवसांनतरही संप सुरूच असल्याने टपाल वितरणावर परिणाम झाला. त्यामुळे भुसावळ विभागात खाजगी वाहन भाडेतत्वावर घेउन दररोज टपाल वितरण केले जात आहे. त्यामुळे टपाल वितरणाच्या खर्चात वाढ झाली आहे.”

Protected Content