रावेर, प्रतिनिधी | भुसावळ येथून बसने बऱ्हाणपूर कडे सहकुटुंब निघालेल्या एका प्रवाशाची ट्रॉली बॅग येथील बस स्थानकावर बस उभी असताना चोरीस गेली, ती बॅग येथील पोलिसांनी लागलीच हुडकून प्रवासी निलेश चुडीवाले यांना परत केल्याने पोलिसांच्या तत्परतेबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.
अधिक माहिती अशी की, आज (दि.१८) निलेश राजाराम चुडीवाले (रा.बुऱ्हाणपूर) नाशिक-बऱ्हाणपूर बसने भुसावळ ते बुऱ्हाणपूर असे सहपरिवार जात असताना बसमध्ये खूप गर्दी होती. दुपारी १.३० वाजेच्या सुमारास ही बस रावेर येथे पोहचली असता त्यांना आपली व्ही.आय.पी. टुरिस्ट ट्रॉली बॅग दिसून आली नाही, शोधाशोध केली असता बॅग बेपत्ता असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ते त्याबद्दल येथील पो.स्टे.ला तक्रार देण्यासाठी आले असता पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी तात्काळ पो. ना. महेंद्र सुरवाडे, पो.कॉ. सुरेश मेढे, महिला पोलीस नयना वडनेरे यांना वरील तक्रारदारासह शोध घेण्यास पाठविले. शोध घेत असता शहरातील रिक्षा चालक शेख गफ्फार शेख मुसा (रा. इमामवाडा) यांनी सांगितले की, एक बॅग डॉ. आंबेडकर चौकात बेवारस स्थितीत पडलेली आहे. त्यावरून तत्काळ पोलिसांनी पाहणी केली व सोबत असलेल्या तक्रारदार चुडीवाले यांनी ती बॅग त्यांचीच असल्याचे सांगितले.
बॅगसह सगळे पुन्हा पो.स्टे. ला आले. त्यावेळी बॅगमधील कपडे, साड्या, महिलांचे ड्रेस, चप्पल, स्लीपर जोड, पावर बँक व इतर कपडे असा एकूण १५ हजार रुपयांचा माल असल्याची खात्री करून बॅग तक्रारदार यांच्याकडे सोपवण्यात आली. येथील पो.स्टे.ला याबाबत मिसिंग क्र. ८७/२०१९ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. बॅगची माहिती देणारे रिक्षा चालक शेख गफ्फार शेख मुसा यांनी पोलिसांची मदत केल्याने त्यांचा पोलीस स्टेशनला सत्कार करण्यात केला व बक्षीस देवून शाबासकीही देण्यात आली. त्यामुळे त्यांचे सोबत असलेल्या इतर रिक्षा चालकांनीही आनंद व्यक्त केला.