भरधाव वाहनाने दुचाकीस्वाराला उडविले !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कामावरून दुचाकीने घरी जात असतांना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावानजीक सोमवारी १५ जानेवारी रोजी रात्री १० वाजता घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. करतार तोताराम पवार वय ४८ रा. मांडवे दिगर ता.भुसावळ ह.मु. कुसुंबा ता.जि.जळगाव असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, करतार पवार हे आपल्या पत्नी आणि तीन मुलांसह जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात राहत होते. ते एमआयडीसीतील मकरा एजन्सी येथे सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला होते. नेहमीप्रमाणे सोमवारी १५ जानेवारी रोजी रात्री १० वाजता कामावरून घरी जाण्यासाठी दुचाकीने निघाले. कुसुंबा गावाच्या काही अंतरावरून येत असतांना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत करतार पवार यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक आणि पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी तपासणीअंती मयत घोषीत केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी निर्मलाबाई, दोन मुले संभाजी, ईश्वर आणि मुलगी भारती असा परिवार आहे.

Protected Content