मुलगा आंतरजातीय विवाह करणार त्यामुळे पित्यानेच संपवले

अकोला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुलगा दुसऱ्या जातीतील मुलीवर प्रेम करतो या रागातून जन्मदात्या पित्याने आणि सख्या भावाने युवकाचा हत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील पिंजर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या टिटवा गावात ता. ९ फेब्रुवारी रोजी घडली. संदीप नागोराव गावंडे (वय २५) असे मृत मुलाचे नाव आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी टिटवा येथील पोलिस पाटील पवन विठ्ठलराव जाधव (वय ४६) यांच्या फिर्यादीवरून गावातील रहिवासी नागोराव कडनाजी गावंडे यांनी फिर्यादीला माहिती दिली की, नागोराव गावंडे ता. ९ फेब्रुवारी रोजी अकरा वाजता अकोला येथून घरी आले. लोखंडी गेटचे कुलूप उघडून आतमध्ये गेले असता, बेडरूममध्ये त्यांचा मुलगा संदीप नागोराव गावंडे (वय २५) हा मृत अवस्थेत दिसला. त्यावरून फिर्यादी हे नागोराव गावंडे सोबत त्यांचे घरी गेले. त्यावेळी संदीप गावंडे त्यांना मृत अवस्थेत दिसून आला.

त्याचे दोन्ही हात-पाय बांधलेले होते, गळ्यावर काळसर वळ होते. त्यामुळे त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पिंजर पोलिस घटनास्थळी पोहचले. पंचनामा करून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविला. संदीपचे हात-पाय बांधले असल्यामुळे व गळ्यावर काळसर वळ असल्याने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यास ठार मारले असल्याची नोंद पिंजर पोलिस स्टेशनला करण्यात आली.

गुन्ह्याचा तपास ठाणेदार राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बंडू मेश्राम यांनी केला. तपासाची चक्रे फिरताच पोलिसांसमोर धक्कादायक माहिती समोर आली. मृतकाचे वडील नागोराव कडनाजी गावंडे (वय ६०) व भाऊ प्रदीप नागोराव गावंडे (वय ३२) यांनीच संदीपची हत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ता. १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मृतक संदीप व तेथील एक युवतीचे गत दोन-तीन वर्षापासून प्रेम संबंध होते. त्यांच्या प्रेम संबंधाची माहिती सर्वांनाच होती. परंतु, युवती दुसऱ्या जातीची असल्याने संदीपच्या कुटुंबातील सदस्यांचा त्यांच्या प्रेमाला विरोध होता. त्यांचा विरोध झुगारून ते काही दिवसांत पळून जाऊन विवाह करणार असल्याची गोपनीय माहिती संदीपच्या घरी मिळाली.

आपल्या मुलाने आंतरजातीय मुलीशी विवाह करू नये यासाठी त्यांनी संदीपची हत्या केल्याची कबुली आरोपींनी पिंजर पोलिसांना दिली. संदीपची हत्या केल्याचा संशय आपल्यावर कोणी घेऊ नये यासाठी मृतकचे वडील व भाऊ यांनी संदीपची हत्या करून मुलीच्या घरच्या व्यक्तीने हत्या केल्याची दिशाभूल केली.

Protected Content