एरंडोल-रतीलाल पाटील ( Exclusive Report ) | जिल्ह्यात वाळू माफियांचा धुमाकूळ सुरू असतांनाच एरंडोलच्या प्रांताधिकार्यांवर वाळू तस्करांनी पाठलाग करत पाळत ठेवल्याची उघडकीस आल्याने त्यांनी थेट पोलिसात तक्रार दिली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
एरंडोल येथे वाळू माफियांची मुजोरी वाढली असल्याचा प्रत्यय आज स्वतः प्रांताधिकार्यांना आला असल्याचा खळबळ जनक प्रकार एरंडोल येथे घडला आहे. येथील उपविभागात प्रांताधिकारी म्हणुन नुकतेच नूतन प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांनी पदभार स्वीकारला आहे. यानंतर त्यांनी लागलीच वाळू तस्करांवर धडका कारवाई सुरू केली आहे. या अनुषंगाने काल दि.१८ मे रोजी सकाळी बांभोरी प्र.चा.ता.धरणगाव परिसरात अवैध वाळू उत्खनन व वाहतुक करणारे वाहनांवर कारवाई करण्यासाठी ते स्वतः गेले. या कारवाईत त्यांनी आठ वाहनांवर कारवाई केली.
दरम्यान, प्रांताधिकार्यांनी आपल्या सहकार्यांसह धडक कारवाई केली असल्याने वाळू तस्कर धास्तावले आहेत. तर कारवाई करत असतांना एक वाहन त्यांच्यावर सातत्याने पाळत ठेवत असल्याचे प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांना दिसून आले. एम.एच.१९ डी.व्ही.९१७१ या क्रमांकाची किया सोनेटा या मॉडेलची कार त्यांचा पाठलाग करत असल्याचे त्यांना दिसून आले. यामुळे त्यांनी या संदर्भात पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली आहे.
ज्यावेळेस प्रांताधिकारी त्यांनी केलेल्या कारवाईत जप्त केलेले ट्रॅक्टर पोलीस स्टेशन येथे जमा करण्यासाठी गेले असता देखील सदर वाहन त्यांचा पाठलाग करत होते. अर्थात, सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत जवळपास तिन तास सदर वाहन सतत त्यांचा पाठलाग करत होते. तसेच, त्या वाहनातील अज्ञात इसमांची कृती ही संशयास्पद वाटल्याने प्रांताधिकार्यांनी पोलिसात तक्रार केली आहे. दरम्यान, सदर गाडीतील दोन-तीन अज्ञात इसम यांना माझा पाठलाग का करत आहात ? अशी चौकशी करण्यासाठी बोलावले असता सदर इसम गाडी पोलीस स्टेशनच्या आवारात सोडून पळून गेले असल्याची तक्रार प्रांताधिकारी गायकवाड यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला दिली आहे.
लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रस्तुत प्रतिनिधीने सदर घटनेची माहिती प्रांताधिकारी यांच्याकडून घेत असतांना घडलेला प्रकार हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याचे दिसुन आले. सदर अधिकारी हे आल्या दिवसांपासून काही संशयित इसम त्यांचा पाठलाग करत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे पाठलाग करणारे कोण ? कशासाठी हा पाठलाग किंवा माझ्यावर पाळत ठेवत असतील याबद्दल त्यांच्या मनात देखील शंका आहे. तथापि सदर पाठलाग करणार्या अज्ञात इसमांचा प्रांताधिकारी गायकवाड व त्यांच्या सहकार्यांनी सिनेस्टाई ल एरंडोल शहरात पाठलाग देखील केला पण ते पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे उपस्थितांनी सांगितले.
या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन पाळत ठेवणार्यांचा बंदोबस्त करावा असे जाणकारांचे मत आहे तसेच जो पर्यंत सदर प्रकरणाचा उलगडा होत नाही तो पर्यंत प्रांताधीकारी व उर्वरित सर्व अधिकार्यांना पोलीस बंदोबस्त द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. विशेष हे की जमा झालेली संशयित इसमांची गाडी दुपार पर्यंत गाडी पोलीस स्टेशनच्या होती व संध्याकाळ पर्यंत सदर गाडी गायब होती. याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. वाळू तस्करांची मुजोरी वाढली असुन अधिकार्यांवर असा प्रसंग ओढवल्याने वाळू माफियांची हिम्मत वाढली असून त्यांना नेमके कुणाचे पाठबळ आहे ? असा प्रश्न आता विचारण्यात येत आहे.