आढावा बैठकीत आ. चंद्रकांत पाटलांनी घेतली झाडाझडती

बोदवड प्रतिनिधी | येथील अग्रसेन भवनात झालेल्या आढावा बैठकीत आमदार चंद्रकांत पाटील यांनी विविध खात्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या सूचना देऊन अधिकार्‍यांची झाडाझडती घेतली.

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील अग्रसेन भवनात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.
यात आमदारांनी विविध प्रश्‍नांवरून संबंधीत खात्यांच्या अधिकार्‍यांना विचारणा केली. यामध्ये प्रामुख्याने सामाजिक वनीकरण योजनेतील दुतर्फा वृक्ष लागवडीच्या नावाखाली सर्रास शासनाची आर्थिक लूट होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे वनक्षेत्रपालांसोबत प्रत्येक कामावर जाणार आहे. वृक्ष जगल्याचे न आढळल्यास वनक्षेत्रपाल यांच्यासह संबंधितांवर कारवाईच्या सूचना दिल्या. तर स्वत: कामावर जात असून कामे समाधानकारक न दिसल्यास मस्टर थांबवण्याची कार्यवाही सुरू असल्याचे तहसीलदार प्रथमेश घोलप यांनी सांगितले. मस्टर थांबवून तातडीने गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही आमदारांनी दिल्या.

यासोबत बोदवड तालुक्यात ऑक्सिजन पार्क संकल्पना राबवणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली. तालुक्यातील अनेक शाळांना छते नाहीत तर प्रस्ताव सादर का करत नाही, असा प्रश्न त्यांनी गटशिक्षणाधिकार्‍यांना विचारला. तर चिंचखेड प्रगणे येथील आदिवासी बांधवांच्या जागांबाबत आढावा घ्या, अशा सूचनाही तहसीलदार, बीडीओंना केल्या. तालुक्यातील प्रसिद्ध शिरसाळा मारोती फाट्याचेही सुशोभिकरण केले जाणार असून त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहितीही आमदार पाटील यांनी यावेळी दिली.

यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रविण चौधरी, प्रशांत पाटील, तहसीलदार प्रथमेश घोलप, गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, तालुका वैद्यकीय अधिकारी मनोज चौधरी, महावितरणचे उपअभियंता महेश पाटील, उपअभियंता दीपक राठोड, मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, विधानसभा क्षेत्र प्रमूख सुनील पाटिल, माजी उपजिल्हाप्रमुख गोपाळ सोनवणे, शांताराम कोळी, दीपक माळी, नगरसेवक आनंदा पाटील, नगरसेवक सुनील बोरसे, नगरसेवक नितीन चव्हाण, कलिम शेख, हर्षल बडगुजर, नईम खान, तालुका समन्वयक अमोल व्यवहारे आदींसह विविध विभागप्रमुख उपस्थित होते.

Protected Content