नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीनंतर आज विधानसभा पोट निवडणुकांच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष होते. सात राज्यातील 13 विधानसभा क्षेत्रात पोटनिवडणूक झाली. या १३ जागांवर १० जुलैला मतदान झाले होते. बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये विधानसभेची पोटनिवडणूक झाली. हिमाचल प्रदेशच्या नालागढ सीट वर सर्वाधिक 78.1 टक्के आणि उत्तराखंडच्या बद्रीनाथ सीटवर सर्वात कमी 47.68 टक्के मतदान झाले होते.
१३ विधानसभा क्षेत्रात झालेल्या या पोटनिवडणुकीत काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीने दमदार प्रदर्शन केलय. इंडिया आघाडीने 11 जागांवर विजय मिळवला. भाजपाला हिमाचल प्रदेशमधील हमीरपूर आणि मध्य प्रदेशच्या अमरवाडा जागेवर समाधान मानाव लागले. हिमाचल प्रदेशात तीन पैकी दोन जागा काँग्रेसने तर एक सीट भाजपाच्या खात्यात गेली. काँग्रेसने देहरा आणि नालागढ सीटवर विजय मिळवला. देहरा येथून सीएम सुक्खू यांच्या पत्नी कमलेश ठाकूर जिंकल्या. नालागढ मधून हरदीप सिंह बावाने भाजपाच्या केएल ठाकूर यांना 8990 मतांनी हरवले. हमीरपूर येथून भाजपाचे आशीष वर्मा जिंकले.
पश्चिम बंगालमध्ये चारही जागा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने जिंकल्या. हिमाचल प्रदेशात तीन पैकी दोन जागा काँग्रेसने आणि एक सीट भाजपाने जिंकली. पंजाबच्या जालंधरमधून आम आदमी पार्टीने बाजी मारली. उत्तराखंडच्या दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या. तामिळनाडू विक्रावंडीची सीट डीएमकेने जिंकली. मध्य प्रदेश अमरवाडाची सीट भाजपाने जिंकली. बिहार रुपौली सीट अपक्ष उमेदवार शंकर सिंह यांनी जिंकली.