पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषि आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) घेण्यात आलेल्या राज्य समाईक प्रवेश परीक्षेच्या (एमएचटी-सीईटी) निकालाची तारीख अखेर ठरली आहे. या परीक्षेचा निकाल उद्या १६ जून रोजी सायंकाळी सहा वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.
सीईटी सेलने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. एमएचटी सीईटी परीक्षा २२ एप्रिल ते १६ मे घेण्यात आली. राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने घेतलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्यचा (जेईई मेन्स) निकाल या पूर्वीच जाहीर झाला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे लक्ष एमएचटी-सीईटीच्या निकालाकडे लागले आहे. सीईटी सेलने निकालाबाबत वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी शिक्षण पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पीसीबी गटाची परीक्षा २२ ते ३० एप्रिल २०२४ दरम्यान, तर पीसीएम गटाची परीक्षा २ ते १६ मे २०२४ दरम्यान घेण्यात आली होती. या दोन्ही परीक्षांमधील प्रश्न व उत्तर तालिका विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवण्यासाठी उपलब्ध केले होते. यावर आक्षेप नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांना २६ मेपर्यंत मुदत दिली होती. यानंतर सीईटी कक्षाकडून प्रथम जूनच्या पहिल्या आठवड्यात, त्यानंतर निकालाची संभाव्य तारीख १० जून जाहीर केली. त्यानंतर एमएचटी सीईटीचा निकाल १९ जून किंवा त्यापूर्वी जाहीर करण्यात येईल, असे सीईटी कक्षाकडून संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने शनिवारी निकालाची तारीख प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केली. त्यानुसार रविवारी (१६ जून) सायंकाळी सहा वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे.