जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ऑरगॅनो फॉस्फोरसच्या विषबाधेमुळे कार्डीआक अरेस्टमध्ये गेलेल्या १३ वर्षीय बालिकेवर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या टीमने केलेल्या उपचाराला यश आल्याने मरणाच्या दारात पोहोचलेल्या बालिकेचा पुर्नजन्मच झाल्याचा प्रत्यय आला. बालिकेचे प्राण वाचल्याने तिच्या कुटूंबियांनी रूग्णालयाप्रती ऋण व्यक्त केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, यावल तालुक्यातील कोरपावली येथील एक १३ वर्षीय बालिका ही घरात काम करीत असतांना अचानकपणे बेशुध्द पडली. तिची श्वसनाची पातळी देखिल कमी झाली होती आणि शरीर निळे पडले होते. अशा परिस्थीतीत या बालिकेला तत्काळ डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या बालरोग विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तीच्या विविध तपासण्या केल्यानंतर तिला ऑरगॅनो फॉस्फोरसची विषबाधा झाल्याचे लक्षात आले. तीन दिवसांनंतर बालिका शुध्दीवर येताच ती कार्डीआक अरेस्टमध्ये गेली. तीला तातडीने कृत्रीम श्वासोच्छवास लावण्यात येऊन उपचार सुरू ठेवण्यात आले.
दोन दिवसांनी तीची प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिचा कृत्रीम श्वासोच्छवास काढण्यात आला. रोग प्रतिबंधक औषधे, नेब्युलायझेशन देऊन उपचार सुरू ठेवले. यावेळी सदर बालिका ही पुन्हा कार्डीआक अरेस्टमध्ये गेली. उपचाराअंती तीची प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिच्या छातीचा एक्स-रे करण्यात आला. त्यात बालिकेला व्हेन्टीलेटरी असोसिएटेड न्युमोनिया झाल्याचे निदान करण्यात आले. तसेच तिच्या दुसर्या फुफ्फुसातही न्युमोनिया असल्याचे दिसून आले. न्युमोनियामुळे तिला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने कृत्रीम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले. योग्य त्या औषधोपचारामुळे चार दिवसांनी सदर बालिका शुध्दीवर आली. आता तिची प्रकृती सुधारत असून मरणाच्या दारात पोहोचलेल्या या बालिकेचा जणू पुर्नजन्मच झाला. सदर बालिकेवर बालरोग विभागातील प्रमुख डॉ. अनंत बेंडाळे, डॉ. सुयोग तन्नीरवार, डॉ. उमाकांत अणेकर, डॉ. दर्शन राठी, डॉ. रोहीणी देशमुख, डॉ. ओमश्री गुडे, डॉ. चंदाराणी देगलूरकर, डॉ. कुशल धांडे यांनी यशस्वी उपचार केले.