देवस्थाने उघडली; भाविकांची दर्शनासाठी गर्दी

जळगाव प्रतिनिधी | राज्य सरकारने आधी जाहीर केल्यानुसार आज घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी सर्वधर्मीय देवस्थाने उघडली आहेत. प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करून भाविकांना दर्शनाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

देशात लॉकडाऊन लागताच देवस्थानेदेखील बंद करण्यात आली होती. तेव्हापासून देवस्थानांना कुलूप लाभले होते जे आजवर कायम होते. राज्यातील कोरानाचे संसर्ग आटोक्यात आला असल्याने देवस्थाने उघडी करण्यात यावीत अशी मागणी विविध राजकीय पक्ष, संघटना आणि जनतेकडून होत होती. या अनुषंगाने राज्य सरकारने घटस्थापनेचा पहिला दिवस म्हणजेच ७ ऑक्टोबरपासून देवस्थाने उघडण्यात येतील अशी घोषणा केली होती. यासाठीची नियमावली देखील जाहीर करण्यात आली होती. तर, याच्याच अनुषंगाने जळगाव जिल्हा प्रशासनानेही मंदिरांसाठीची नियमावली जाहीर केली होती.

दरम्यान, आज सकाळपासून जिल्ह्यासह राज्यातील सर्व देवस्थाने उघडण्यात आली आहेत. भाविकांनी नियमांचे पालन करून देव दर्शन घ्यावे अशी व्यवस्था बहुतेक ठिकाणी करण्यात आलेली आहे. जळगाव जिल्ह्याचा विचार केला असता, जिल्ह्यामध्ये अनेक लहान-मोठी देवस्थाने आहेत. आज पहाटेपासून आरती करून देवस्थाने भक्तांसाठी खुली करण्यात आली आहेत. यात पद्मालय आणि तरसोद येथील गणेश मंदिरासह मुक्ताई देवस्थान, आदिशक्ती मनुदेवी मंदिर, अमळनेरचे मंगळग्रह मंदिर, पाटणादेवीचे मंदिर आदींसह अन्य सर्व देवस्थानांचा समावेश आहे.

Protected Content