लवाद नेमण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या हिताचाच- सुनिल महाजन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । महापालिका आणि वाटरग्रेस कंपनी यांच्यात वाद उद्भवल्यास त्याच्या निपटाऱ्यासाठी त्रयस्थ लवाद नेमण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या हिताचाच आहे. असा खुलासा आज महापालिकेचे विरोधी पक्ष नेता सुनिल महाजन यांनी केला.

ॲड. विजय भास्कर पाटील यांनी पत्रपरिषद घेवून वाटर ग्रेस कंपनी आणि महापालिका यांच्या झालेल्या शहराच्या स्वच्छतेच्या ठेक्याच्या करारात झालेल्या चुकीवर बोट ठेवले होते. ठरलेली मलई महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सदस्य व नगरसेवकांसह आयुक्तांनाही मिळावी म्हणून नियमाच्या विरोधात जावून या करारात आयुक्तांनाच लवाद म्हणून कामाची भूमीका सोपविल्याचा आरोप ॲड. विजय भास्कर पाटील यांनी केला होता.

या संदर्भात महापालिकेचे विरोधीपक्ष नेते  सुनिल महाजन म्हणाले की, महापालिकेने २०१९ सालात वाटरग्रेस कंपनीसोबत करार करतांना ही चूक झाली होती. लवाद नेहमी त्रयस्थ व्यक्ती असावे लागते. निवृत्त जिल्हा न्यायाधिश किंवा निवृत्त सनदी अधिकारी असा लवाद म्हणून नेमता येतो. असा स्पष्ट लवाद विषयक कायदा आहे. त्याकडे दुर्लक्ष करून महापालिकेच्याच आयुक्तांची म्हणजे करारनामा करणाऱ्यांपैकी एका गटातील माणसांची लवाद नेमणूक केली गेली होती. आता ही चुक दुरूस्त करतांना स्वतंत्र व त्रयस्थ व्यक्तीची लवाद म्हणून नेमणूक करावी असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने मानलेला आहे. हा प्रस्ताव कायदेशीर योग्य व महापालिकेच्या हिताचा असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

Protected Content