जळगाव प्रतिनिधी । मनपा महासभेत आज शहरातील सर्व म्हणजे १६ व्यापारी संकुलांमधील गाळ्यांच्या भाडे आकारणीबाबतचा महापालिका प्रशासनाने मांडलेला प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला.
महापालिकेच्या आजच्या महासभेत आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. कोरोनाची परिस्थिती, गेल्या वर्षभरात त्यामुळे पायाभूत सुविधांसाठी उद्भवलेल्या व अचानक कराव्या लागणाऱ्या खर्चाचा अनुभव लक्षात घेवून पुढच्या वर्षातही दक्षाता घ्यावी लागेल. या मुद्द्यावर अर्थसंकल्पाची रचना करतांना प्रशासनाने भर दिला होता. हे वास्तव लक्षात घेवून आगामी काळात विविध करांच्या वसुलीवर आणि उत्पन्नावर जोर दिल्याशिवाय उपाय नाही. अशी भूमिका प्रशासनाने आज महासभेत मांडली होती.
आगामी वर्षात नवीन वाहन खरेदीसाठी दोन कोटी, नव्या स्मशानभूमीच्या निर्मीतीसाठी १ कोटी, समांतर रस्त्यांवरील पथदिव्यांच्या व्यवस्थेसाठी २ कोटी रूपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. महापालिकेचा खर्च व उत्पन्न लक्षात घेवून या महासभेने अगदीच आवश्यक असलेले बदल सुचवावे किंवा हा अर्थसंकल्प जश्याच्या तसा मंजूर करावा अशी विनंती महासभेला स्थायी समिती सभापतींनी सुरूवातीलाच केली होती. गाळ्यांच्या भाड्यातून १६० कोटी उत्पन्न अपेक्षीत असल्याची भूमीका प्रशासनाने घेतली आहे. त्याचप्रमाणे खुला भूखंड दर जास्तीत जास्त वसूल करण्याचे धोरण पुढच्या वर्षभरात राबविले जाणार आहे. शहरातील वीज व्यवस्थेसाठी ६० लाख आणि नाले सफाई २५ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
यावेळी महासभेला महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतिष कुळकर्णी यांच्यासह ऑनलाईनमध्ये सर्व नगरसेवक उपस्थित होते.