Home उद्योग वारंवार खंडित वीजपुरवठ्याची समस्या लवकरच सोडवणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारंवार खंडित वीजपुरवठ्याची समस्या लवकरच सोडवणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील उमाळा–नशिराबाद औद्योगिक परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे उद्योगधंद्यांना मोठा फटका बसत असून उद्योजकांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. नियमितपणे लाखो रुपयांची वीजबिले भरूनही वीजपुरवठा सुरळीत नसल्यामुळे उद्योगपतींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्योजकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन आपली समस्या मांडली असून ही अडचण लवकरच सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

उमाळा–नशिराबाद परिसरात विविध लघु व मध्यम औद्योगिक कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन प्रक्रिया सुरू असते. मात्र वारंवार वीजपुरवठा खंडित होण्यामुळे उत्पादन थांबते, यंत्रसामग्रीचे नुकसान होते आणि कामकाज ठप्प होते. त्यामुळे उद्योगधंद्यांचे आर्थिक नुकसान वाढत असून कर्जफेड, कामगारांचे वेतन आणि दैनंदिन खर्च भागवताना उद्योजकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जळगाव ग्रामीण इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष सचिन लढ्ढा यांनी रविवारी सकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या अडचणी सविस्तरपणे मांडल्या. वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडितामुळे उद्योगांना मोठे नुकसान होत असल्याचे त्यांनी नमूद केले. या बैठकीत मनोज बियाणी, हरीश जोशी, मुकेश दहाड, ललित लढ्ढा, तुषार पाटील, गजेंद्र मराठे आणि नरेश बागडे आदी उद्योजक उपस्थित होते.

उद्योजकांनी यापूर्वीही उमाळा परिसरातील कंपन्यांना भेडसावत असलेल्या वीज समस्येबाबत महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना अनेक वेळा निवेदन दिले होते. मात्र त्याकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले गेले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सततच्या वीजपुरवठा खंडितामुळे उत्पादन प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असून औद्योगिक क्षेत्राच्या विकासालाही त्याचा फटका बसत असल्याचे उद्योजकांनी सांगितले.

यावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ही समस्या तातडीने सोडवण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येतील, असे स्पष्ट केले. चिंचोली येथील महावितरण उपकेंद्रातून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असून ५ केव्ही क्षमतेचा अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहे. या उपाययोजनांमुळे वारंवार होणारे ट्रिपिंग कमी होईल आणि औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना स्थिर वीजपुरवठा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उमाळा–नशिराबाद परिसरातील कंपन्यांसाठी चिंचोली येथील महावितरण उपकेंद्रात यापूर्वीच ३२ केव्ही ट्रान्सफॉर्मरसाठी निधी मंजूर करण्यात आला असून त्या कामालाही सुरुवात झाली आहे. त्यातच आता ५ केव्ही क्षमतेचा अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसविण्याचा निर्णय झाल्याने उद्योगांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे वारंवार होणारे ट्रिपिंग थांबेल आणि उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान टळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या निर्णयाबद्दल उमाळा–नशिराबाद औद्योगिक परिसरातील उद्योजकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले. लवकरात लवकर ठोस उपाययोजना झाल्यास औद्योगिक उत्पादन सुरळीत होईल आणि स्थानिक उद्योगांना नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


Protected Content

Play sound