जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील धोबी वराड गावात वाळू माफियांच्या बेदरकारपणामुळे एका निष्पाप वृद्धाला आपला जीव गमवावा लागला आहे. शनिवारी २८ मार्च रोजी संध्याकाळी ७ ते ८ वाजेच्या सुमारास वाळू खाली करून भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने बशीरशहा मगबुलशा फकीर (वय-७५) यांना चिरडले. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
जळगाव तालुक्यातील धोबी वराड येथील रहिवासी असलेले बशीरशहा फकीर हे शनिवारी २८ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता काही कामानिमित्त गावातील मराठी शाळेकडे गेले होते. याच वेळी (एमएच ४७ एएस ९५४८) क्रमांकाचा डंपर शाळेत वाळू खाली करून अतिशय वेगाने बाहेर पडत होता. बस स्टँड ते मराठी शाळा दरम्यान चालकाने डंपर बेदरकारपणे चालवत बशीरशहा यांना जोरदार धडक देवून चिरडल्याने त्यांचा जागीच दुदैवी अंत झाला.

अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त डंपर ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात लावला आहे, तर आरोपी चालकाला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होती. मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला असून, रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.



