दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी नवी दिल्ली येथील सीबीसीआय केंद्र परिसरातील ‘कॅथोलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडिया’च्या वतीने आयोजित केलेल्या नाताळ साजरा करण्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. भारतातील कॅथोलिक चर्चच्या मुख्यालयामध्ये होणाऱ्या अशा प्रकारच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांची उपस्थिती असण्याची ही पहिलीच वेळ होती. कार्डिनल, बिशप आणि चर्चमधील प्रमुख नेत्यांसह ख्रिश्चन समुदायातील प्रमुख नेत्यांशीही यावेळी पंतप्रधानांनी संवाद साधला.
देशातील नागरिकांना आणि जगभरातील ख्रिश्चन समुदायाला नाताळच्या हार्दिक शुभेच्छा देताना पंतप्रधान म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मी केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांच्या निवासस्थानी ख्रिसमसच्या समारंभात सहभागी झालो होतो आणि आता बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया (सीबीसीआय) च्यावतीने आयोजित या कार्यक्रमात सर्वांबरोबर सहभागी होण्याचा सन्मान मला मिळतो आहे. कॅथोलिक सीबीसीआय च्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त होत असलेला हा विशेष कार्यक्रम आहे. या उल्लेखनीय टप्प्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी सीबीसीआय आणि त्यांच्याशी संबंधित सर्वांचे अभिनंदन केले.