मुंबई (वृत्तसंस्था) आधीच्या सरकारने गृहखात्याच्या माध्यमातून सरकार टिकवले तर ‘नगर विकास’मार्फत पक्षाचा आर्थिक विकास केला,” असा आरोप शिवसेनेने केला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या चहापान कार्यक्रमावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला होता. याच मुद्यावरून शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर टीका केली आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, नागपुरात विरोधकांकडे कोणते मुद्दे आहेत ते नंतर पाहू, पण सरकारने आताच काम सुरू केले व हे पहिलेच अधिवेशन आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी विधायक भूमिका घ्यावी ही राज्याची अपेक्षा आहे. ‘विरोधकांचा चहापानावर बहिष्कार’ या परंपरेतून नव्या विरोधी पक्षनेत्यांनी आता तरी बाहेर पडावे अशी माफक अपेक्षा सगळय़ांचीच होती. मात्र त्यांनी चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आणि सवंग परंपरेचे पाईक बनण्यात धन्यता मानली,” असा खोचक टोला शिवसेनेनं भाजपाला लगावला आहे. आधीच्या सरकारने गृहखात्याच्या माध्यमातून सरकार टिकवले तर ‘नगर विकास’मार्फत पक्षाचा आर्थिक विकास केला. बांधकाम खात्याने रस्त्यावरील खड्डे बुजवले नाहीत, पण अनेकांच्या तिजोरीचे खड्डे बुजवले अशी बाहेर चर्चा आहे. गृहखाते तर नोकरासारखे व पक्षाच्या कार्यकर्त्यांसारखे वापरले. काही अधिकारी तर सत्ताधारी पक्षाच्या सतरंज्या झटकत होते, पण आता राज्य बदलले आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे फार काही ठेवले नाही व जरा औदार्यानेच खातेवाटप केले,असेही अग्रलेखात म्हटले आहे.