उदगीर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उदगीरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये चक्क पोलिसांनीच बोकडाचा बळी दिला आहे. गुन्हे कमी व्हावेत म्हणून हा बळी देण्यात आल्याचं कळतंय. त्यामुळे ज्यांच्यावर अंधश्रद्धा रोखण्याचे काम आहे, त्यांच्याकडूनच अंधश्रद्धेला चालना मिळत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
उदगीर हद्दीत गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होत आहे. यावर उपाय म्हणून एका अधिकाऱ्याने बोकडाचा बळी देण्याचा पर्याय सुचवला. त्यानंतर पोलिसांनी बोकडाचा बळी देण्याचं ठरवलं. एक बोकड आणण्यात आला आणि पोलीस स्टेशन परिसरातच बोकड कापण्यात आला. त्यानंतर या बोकडाच्या मटनाची बिर्याणी करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
पोलीस स्टेशनमध्ये काय-काय घडू लागलंय अशी चर्चा आता सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला होता. त्यामुळे खळबळ उडाली होती. आता पोलीस स्टेशनमध्येच बोकडाचा बळी दिला गेला असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पोलीसच अंधश्रद्धेला बळी पडले आहेत. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे याप्रकरणात काय कारवाई होते हे पाहावं लागेल.