जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा दूध संघात झालेल्या अपहाराबाबत गुन्हा दाखल करण्यात पोलीस कर्मचारी दिरंगाई करत आहे. यासंदर्भात एकनाथराव खडसे यांनी गुरूवार १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत आक्रमक भूमिका घेत पोलीस अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. खडसे म्हणाले की, जळगाव जिल्हा दूध संघात अपहार झाला आहे. यासंदर्भात एखाद्या आमदाराला गेल्या तीन तासांपासून पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन करावे लागत आहे. कुणाच्या दबावाखाली तुम्ही काम करत आहात. असा खडा सवाल माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी पोलीसांना केला आहे.
जळगाव जिल्हा दूध संघात बटर आणि दूध पावडर यामध्ये लाखो रूपयांचा अपहार झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. अपहार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणी शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना केली होती. परंतू गुन्हा दाखल झाला नाही. यासाठी स्वत: माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे आणि जिल्हा दूध संघाच्या चेअरमन मंदाकिनी खडसे यांनी गुरूवार १३ ऑक्टोबर रोजी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून गुन्हा दाखलची मागणी केली. परंतू पोलीस अधिकारी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहे. यासाठी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी कार्यकर्त्यांसह शहर पोलीस ठाण्यात येवून गुन्हा दखल करण्यासाठी ठिय्या आंदोलन सुरू केले.
याप्रसंगी दूध संघाच्या चेअरमन मंदाकिनी खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा मंगला पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.