जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून सतत पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून जळगाव जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना सोमवारी ३० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून सततच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे लागवड केलेले सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे खरीप हंगाम याचे मोठे नुकसान झाले आहे, शिवाय शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात सापडला आहे. पिकांसाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढून लागवड केलेली आहे. तसेच रासायनिक खते व फवारण्यासाठी मोठा खर्च केलेला आहे. परंतु सततच्या पावसामुळे शेतकरी खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यासाठी लवकरात लवकर नुकसानग्रस्त भागात जाऊन पिकांचे पंचनामे करून जळगाव जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे, याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.