प्रवाशी वृध्दाला लुटणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; एलसीबीची कारवाई

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात रिक्षात बसलेल्या प्रवाशी वृध्दाला लुटणाऱ्या तीन जणांच्या शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत.

मोसिन खान उर्फ शेमड्या नूरखान पठाण वय-२८, शाहरुख शेख रफीक वय-२० दोघ रा. पिंप्राळा हुडको, समाधान सुमेरसिंग पाटील वय-३३ रा. खंडेराव नगर अशी अटकेतील तिघांची नावे आहेत.

शहरातील तांबापुर परिसरातील शेख जलील शेख ईब्राहीम (वय-७२) हे धुळे जाण्यासाठी आकाशवाणी चौकात वाहनाची वाट पाहत थांबले होते.  यावेळी एक ऑटो रिक्षाचालक त्यांच्याजवळ थांबला आणि त्यांना कोठे जाता आहेत असे विचारले. यावेळी वयोवृद्ध शेख जलील यांनी त्यांना धुळे जात असल्याचे सांगितल्यानंतर  रिक्षाचालकाने आम्ही देखील धुळे जात असल्याचे सांगत त्यांना रिक्षात बसवून ते धुळे रोडने मार्गस्थ झाले. रिक्षात बसण्याआधीच रिक्षात तीन अनोळखी इसम बसलेले होते. त्यांनी वयोवृद्ध शेख जलील यांच्या खिशातील १५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने काढून घेत त्यांना रस्त्यात उतरवून ते त्याठिकाणाहून पळून गेले. याप्रकरणी शेख यांच्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वयोवृद्धाला लुटल्याची घटना घडताच पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अकरम शेख, सुधाकर अंभोरे, प्रितम पाटील, राहूल पाटील, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे, भारत पाटील याचे पथक तयार केले.

पथकाने संशयीतांचा शोध घेत मोसिन खान उर्फ शेमड्या नूरखान पठाण वय-२८, शाहरुख शेख रफीक वय-२० दोघ रा. पिंप्राळा हुडको, समाधान सुमेरसिंग पाटील वय-३३ रा. खंडेराव नगर यांना ताब्यात घेतले. त्यांची विचारपुस केली असता त्यांनीच वृद्धाला लुटल्याची कबुली दिली. तसेच मोसीन खान उर्फ शेमड्या हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो प्रवाशांना रिक्षात बसवून त्यांची जबरी लुट करीत असतो, त्याच्याविरुद्ध शहरातील अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.  पुढील कार्यवाहीसाठी रामानंदनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

Protected Content