व्हाटसअपच्या स्टेटस वरून दोन गटात तुंबळ हाणामारी

पहूर , ता . जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | व्हाटसअप स्टेटसवरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना आज तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथे घडली असून यात दोन्ही गटातील ११ जण जखमी झाले आहेत.

या संदर्भातील वृत्त असे की, सध्या सोशल मीडियाच्या वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून ग्रामीण भागातही तरूण व्हाटसअपवर वेगवेगळे स्टेटस ठेवताना आढळतात. पहूर येथून जवळच असलेल्या पिंपळगाव बुद्रुक येथे एका तरुणाने असेच स्टेटस ठेवले. त्यास दुसर्‍या तरुणाने हसण्याची इमोजी वापरून प्रतिसाद दिल्याने स्टेटस ठेवणार्‍या तरुणाला राग आला. याच क्षुल्लक कारणावरून दोन गट समोरासमोर आले .त्यांच्यात बचावाची सुरू झाली .काही वेळाने त्याचे पर्यावसान तुंबळ हाणामारीत झाले.

या हाणामारीत दोन्ही गटांनी लाट्या काठ्यांचा हाणामारीत सर्रासपणे वापर केल्याने सुमारे ११ जण जखमी झाले असून त्यातील नऊ जणांना जळगावला हलविण्यात आले आहे. ही घटना आज गुरुवारी घडली .

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड , ज्ञानेश्वर ढाकरे , प्रवीण बंजारा यांनी घटनास्थळ गाठून लोकांना शांत केले .सर्व जखमींना सायंकाळी पहूर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले .ग्रामीण रुग्णालयात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती . या हाणामारीतील करीम वली तडवी ( ३५ ) , नुरखा गफुर तडवी ( ३१ ) , आकाश सुपडू तडवी ( २२ ) , सोहील सुभान तडवी (२१ ) , जब्बार गफ्फार तडवी ( ३५ ) जमीर वली तडवी ( ३ २ ) , हुसेन वजीर तडवी ( २५ ) , कुरशाद बाई दिलावर तडवी ( ४ ५ ) मोहसीन युसूफ तडवी ( २ ६ ) यांना जळगावला हलविण्यात आले असून अय्युब जाफर तडवी ( १८ ) , फिरोज दिलावर तडवी ( २ २ ) या दोघांवर पहूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय राठोड , डॉ . नजमुद्दीन तडवी यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील सहकार्‍यांनी तातडीने प्रथमोपचार केले .याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते . गावकर्‍यांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम ठेवण्याचे आवाहन पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड यांनी केले आहे.

Protected Content