म्हसावद येथे कौटुंबिक वादातून मोठ्या भावाचा निर्घृण खून; भावाला अटक

जळगाव प्रतिनिधी । कौटुंबिक वदातून लहान भावाने मोठ्या भावाचा निर्घृण हत्या केल्याची घटना तालुक्यातील म्हसावद येथे गुरूवारी सायंकाळी घडली. घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून मृतदेहाचे विल्हेवाट लावण्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी भावाला एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील म्हसावद येथील खडसे नगरात जितेंद्र प्रकाश इंगळे (कोळी)(वय-३०) आणि संदीप प्रकाश इंगळे (कोळी) (वय-२५) हे दोघे सख्खे भाऊ आई प्रमिलाबाई प्रकाश इंगळे कोळी असे राहतात. यातील जितेंद्र इंगळे याला दारू पिण्याची सवय होती. गुरूवारी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास दोघांमध्ये कौटुंबिक वदातून शाब्दीक चकमक झाली. जितेंद्र हा दारूच्या नशेत शिवीगाळ करत होता. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. यात संतापाच्या भरात संदीप इंगळे याने मोठा भाऊ जितेंद्र याच्या डोक्यात लाकडी दांडका हाणून निर्घृण हत्या केली. दोघांचे भांडण सुरू असतांना शेजारी असणारे दशरथ धरमसिंग वाघेले, समीर पठाण आणि सद्दाम मणियार यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. संदीपने दशरथ वाघेले यांना हातावर व डोक्यावर काठी मारून जखमी केले. मात्र या दोघांनी संशयित आरोपी संदीप याला मदत केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जितेंद्रचा मामा दशरथ गंगाराम कोळी तेथे आला. दरम्यान, मोठा भाऊ ढाबावरून पडल्याचा बनाव करत संशयित आरोपी संदीपने जखमीवस्थेत जितेंद्रला जळगावातील डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मृत घोषीत केले.

एमआयडीसी पोलीसांना घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे विनायक लोकरे, पोउनि संदीप पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी व पोलीस कर्मचारी समाधान पाटील, पोना स्वप्नील पाटील, पोहेकॉ बळीराम सपकाळे, पो.ना. शिवदास चौधरी, शशिकांत पाटील यांनी आज सकाळी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. दरम्यान संशयास्पद मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्यांनी परिसरात चौकशी केली असता दोघा भावांचे गुरूवारी सायंकाळी कडाक्याचे भांडण झाल्याचे समोर आले. याप्रकरणी संशयित आरोपी संदीप इंगळे यांच्यासह अन्य दोघांना एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. जखमी झालेले व्यक्ती दशरथ वाघेले यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोदविण्यात आला आहे.

Protected Content