ऑर्बिटर साडेसात वर्षे चंद्राभोवती फिरून पाण्याचा शोध घेणार

orbitor

बंगळूरू, वृत्तसंस्था | चांद्रयान-२ मोहिमेतील लँडरशी संपर्क तुटला असला तरी चंद्राच्या कक्षेत फिरत असलेला ऑर्बिटर निर्णायक ठरेल असा विश्वास इस्रोचे प्रमुख सिवान यांनी व्यक्त केला आहे. ऑर्बिटरचे वाढलेले आयुष्य चांद्रयान-२ मोहिमेच्या पथ्यावर पडणारे असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले आहे. आधी ऑर्बिटरचे आयुष्य एक वर्ष असणार होते. पण जीएसएलव्ही प्रक्षेपकाने ऑर्बिटरला अचूक कक्षेत प्रस्थापित केले तसेच त्यामध्ये इंधन जास्त असल्यामुळे ऑर्बिटर आणखी साडेसात वर्षे कार्यरत रहाणार आहे. त्यामुळे पाण्यासंदर्भात महत्वपूर्ण शोध ऑर्बिटरच्या माध्यमातून लागू शकतो.

 

ऑर्बिटरमुळे चंद्रावर बर्फ आणि पाणी शोधून काढण्याची संधी आहे. चंद्राच्या पृष्ठभागाखाली १० मीटरपर्यंत गोठलेले पाणी पाहण्याची क्षमता आमच्याकडे आहे. आपण इतिहास घडवू, असा विश्वास सिवन यांनी व्यक्त केला. ऑर्बिटरची कक्षा बदलून त्याला चंद्राच्या आणखी जवळ नेण्याचा इस्रोमध्ये विचार सुरु असल्याचे एका वैज्ञानिकाने म्हटले आहे.

ऑर्बिटरमध्ये एकूण आठ पेलोड आहेत. मोहिमेसाठी ठरवलेली सर्व उद्दिष्टये पूर्ण केल्यानंतर ऑर्बिटरची कक्षा बदलण्याचा विचार आहे. लोअर ऑर्बिटमधून कॅमेऱ्याचा पुरेपूर वापर करण्याचीही योजना आहे. चंद्रापासून ५० किलोमीटरच्या कक्षेत गेलो तर फोटो अजून चांगले मिळतील. यासंबंधी कोणताही अंतिम निर्णय मात्र अद्याप घेतलेला नाही. ऑर्बिटरचे आयुष्य साडेसात वर्षांचे असल्यामुळे आपणास बरीच संधी आहे. ऑर्बिटरमध्ये हाय रेसोल्युशनचे उत्तम कॅमेरे बसवलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण चांद्रभूमीची माहिती मिळवता येईल, असे सिवन यांनी सांगितले.

Protected Content