जळगाव ग्रामीण : नाराजांची मनधरणी करण्यात यशस्वी ठरणाराच निवडणूक जिंकेल

111e14e5 51a6 46ad 9c73 52e0f89aa942

 

धरणगाव : कल्पेश महाजन जळगाव ग्रामीण मतदार संघात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आलटून-पालटून वर्चस्व राहिले आहे. गेल्यावेळी येथून निवडून आलेले गुलाबराव पाटील हे सध्या राज्याच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री असल्यामुळे त्यांची स्थिती उजवी आहे. परंतू माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे चिरंजीव विशाल देवकर यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केल्यामुळे ‘जळगाव ग्रामीण’मधील लढत चुरशी होणार, हे स्पष्ट आहे. मात्र, शिवसेना,राष्ट्रवादीतील नाराजांची मोठी संख्या लक्षात घेता नाराजांची मनधरणी करण्यात यशस्वी ठरणाराच निवडणूक जिंकेल,हे देखील तेवढेच खरे आहे.

 

जळगाव ग्रामीण मतदार संघ मराठा बहुल मनाला जातो. विद्यमान आमदार गुलाबराव पाटील हे अल्पसंख्य समाजाचे प्रतिनिधी आहेत. पण त्यांचे धडाडीचे व्यक्तिमत्व, आक्रमक वक्तृत्व, प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी, अशा अनेक लोकप्रिय जमेच्या बाजूंमुळे त्यांना आजवर येथून नेहमीच जनाधार लाभला आहे. त्याचवेळी त्यांच्यामुळे दुखावले गेलेली मंडळीही येथे बरीच प्रभावी आहेत. २००९ मध्ये मतदार संघ फेर रचनेनंतर त्यांचा पराभव करणारे त्यांचेच नामबंधू गुलाबराव देवकर यांचे व्यक्तिमत्व अगदी त्यांच्या विरुद्ध आहे. देवकर कमी बोलणारे, शांत स्वभावाचे आणि मवाळ प्रकृतीचे आहेत.

 

गेल्यावेळी विधानसभेत पराभूत झाल्यानंतर यंदा देवकर यांनी लोकसभेची निवडणुकही लढवली, मात्र त्यांना भाजप उमेदवार उन्मेष पाटील यांच्यापुढे पराभव पत्करावा लागला. आता ते जळगावच्या घरकुल घोटाळ्यात अडकल्याने यंदा निवडणूक रिंगणातून बाहेर आहेत. तर विधानसभेत शिवसेना-भाजपची निवडणूकपूर्व युती होते की नाही ? याबाबत आचार संहिता लागु होऊन निवडणुकीची घोषणा झाली, तरी सस्पेन्स कायम आहे. ही युती होते की नाही ? यावर बरीच गणिते ठरणार आहेत.

 

गुलाबराव देवकर जरी निवडणूक रिंगणात नसले तरी त्यांच्या जागी त्यांचे सुपुत्र विशाल देवकर हे उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी स्वत:च जाहीर केले आहे. स्थानिक रा.कॉ. कार्यकर्त्यांचाही तसा पक्ष श्रेष्ठींकडे आग्रह होता. रा.कॉ. आणि कॉंग्रेसने या निवडणुकीत आघाडी केली असल्याने त्यांना समविचारी पक्षाकडून आव्हान मिळण्याची शक्यता नाही. मात्र रा.कॉ.तच स्थानिक पातळीवर दोन गट आहेत. संजय पवार यांचा गट त्यांची डोकेदुखी ठरू शकतो. त्याचवेळी शिवसेनेकडून नाराज असलेल्या स्थानिक भाजपा नेत्यांचा मात्र देवकर यांना छुपा पाठींबा मिळू शकतो. त्यातच सेना भाजपचे जर पुन्हा बिनसले तर भाजपचा स्वतंत्र उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या पुढील आव्हान आणखी वाढवू शकतो. या संभाव्य उमेदवारात पी.सी. पाटील, संजय महाजन व चंद्रशेखर अत्तरदे यांच्यात चुरस राहील. त्यात महाजन सोडून दोघे माजी मंत्री खडसे यांचे समर्थक म्हटले जातात. त्यामुळे विद्यमान पालकमंत्री ना. महाजन हे संजय महाजन यांच्यासाठी आग्रह धरण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, उर्वरित दोघांची मतदार संघात चांगली पकड असल्याने सर्वसमावेशक उमेदवार न दिला गेल्यास भाजपचीही गणिते बिघडण्याची शक्यता आहे.

 

आधी निवडणुकीत न उतरण्याचा पवित्रा घेणाऱ्या मनसेनेही आता निवडणूक लढण्याची तयारी चालवली असल्याने त्यांनी येथे उमेदवार दिला तर शिवसेनेचे गणित आणखी बिघडू शकते. त्यात बहुजन विकास आघाडी हा एक पक्षही आघाडी आणि युतीच्या उमेदवारांना डोकेदुखी ठरणारा आहे. आणखी एक उपद्रवी पक्ष एमआयएमचा या मतदार संघात काहीच प्रभाव नाही. नाहीतर तो एक फॅक्टर विजयाची गणिते बदलण्यात महत्वाचा ठरला असता. त्यातच रा.कॉ. कडून इच्छुक असलेले विशाल देवकर युतीची गणिते बदलली तर भाजपचे उमेदवार होऊ शकतात. अशा जर-तर च्या अनेक शक्यता सध्या इच्छुक उमेदवारांची काळजी वाढवीत आहेत. थोडक्यात नाराजांची मनधरणी, विरोधकांवर कुरघोडी करण्याची क्षमता आणि जनतेचा पाठींबा मिळवणे, अशा तीन आघाड्यांवर यशस्वी ठरणारा उमेदवार शोधणे, हेच सध्या सगळ्या पक्षांपुढे आव्हान आहे. अखेर ७ ऑक्टोबरला उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाल्यानंतरच विजयाची गणिते जमवण्यात उमेदवारांची कसोटी लागणार आहे. त्यात हे सगळे गप्प बसून डोळसपणे पाहणारा मतदार ऐनवेळी नेमका कुणाला कौल देतो, त्यावरच कोण बाजी मारतो, ते ठरणार आहे.

Protected Content