आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा राष्ट्रवादीला राम राम !

70446895

 

मुंबई (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील वजनदार नेते आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अखेर आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपात प्रवेश करण्याची शक्यता असून त्यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत.

शिवेंद्रसिंहराजेंच्या पक्षांतरामुळे साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचा गड समजल्या जाणाऱ्या साताऱ्यात अनेक दिवसांपासून मुसंडी मारू पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाला मतदारसंघात मोठी ताकद मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश करावा असा प्रस्ताव कार्यकर्त्यांनी मांडला होता. भाजपा प्रवेशाचा सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्याने शिवेंद्रसिंहराजे यांनी कार्यकर्त्यांच्या विचाराचाच निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगत एकप्रकारे भाजपात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेतच दिले.

राजीनामा दिल्यानंतर प्रतिक्रिया देताना शिवेंद्रसिंहराजेंनी सांगितले की, मतदारसंघातील कामं न झाल्याने आपण आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे आहे. आज संध्याकाळी कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. भाजपासोबत जाणे जास्त योग्य होईल, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पुढे बोलताना त्यांनी आपण शरद पवारांचा शब्द डावलत नसल्याचेही सांगितले तसेच मी भाजपाकडे कोणतीही मागणी केलेली नाही. माझे प्राधान्य मतदारसंघ आणि त्यातील कामाला असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस – राष्ट्वादीचे सरकार येईल याबाबत शंका आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले. दरम्यान,माझी कुणावरही नाराजी नाही, मी लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या शब्दाखातर पक्षाचे काम केले. उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला विरोध असतानाही मी शरद पवार यांच्या शब्दाखातर हे काम केले. मी पक्षाशी गद्दारी केलेली नाही,असेही शिवेंद्रसिंहराजेंनी सांगितले.

Protected Content