
अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील कळमसरे–शहापूर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असली तरी आवश्यक त्या सुरक्षिततेच्या उपाययोजना न केल्याने हा रस्ता सध्या वाहनचालकांसाठी धोक्याचा ठरत आहे. विशेषतः सूचना फलकांचा अभाव आणि रस्त्यावर सुरू असलेले खोदकाम यामुळे रात्रीच्या वेळी अपघाताची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे.

कळमसरे–शहापूर रस्त्याच्या विकासासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून सध्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामात माती मिश्रित बारीक चुरा खडीचा वापर करून खडी दाबली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र या प्रक्रियेदरम्यान कामाची गुणवत्ता आणि सुरक्षितता याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वाहनचालक व ग्रामस्थांकडून केला जात आहे.
शहापूर ते कळमसरे या सुमारे पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर जवळपास सात ते आठ ठिकाणी लहान फरशी पुलांची कामे प्रस्तावित आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी खोदकाम करण्यात आले असून वाहतुकीसाठी बाजूला पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र या बदलाची कोणतीही पूर्वसूचना नसल्याने, विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना याचा अंदाज येत नाही आणि अपघात होण्याची शक्यता अधिक वाढली आहे.
फरशी पुलांच्या कामासाठी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले असताना संबंधित ठेकेदाराने आवश्यक ते सूचना फलक, दिशादर्शक चिन्हे किंवा रात्री दिसतील असे रिफ्लेक्टर लावणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र या बाबतीत ठेकेदाराचा निष्काळजीपणा स्पष्टपणे दिसून येत असून संबंधित यंत्रणांकडूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
ज्या ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे त्या सर्व ठिकाणी रस्त्याच्या कामाबाबत स्पष्ट सूचना फलक लावणे अनिवार्य आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रत्यक्ष पाहणी करून कामाची स्थिती तपासावी आणि ठेकेदाराला सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याबाबत सक्त सूचना द्याव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व वाहनचालकांकडून केली जात आहे.
हा रस्ता अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होता. माजी मंत्री अनिल पाटील यांनी मागील पंचवार्षिक काळात या रस्त्यासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा निधी मिळवून दिल्यानंतर विकासाचे काम सुरू झाले आहे. मात्र हे काम दर्जेदार आणि टिकाऊ व्हावे, अशी कळमसरे व शहापूर परिसरातील ग्रामस्थांची अपेक्षा आहे. कामात गुणवत्ता आढळून न आल्यास रस्त्याचे काम बंद करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला असून संबंधित अधिकाऱ्यांनी वेळोवेळी रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी होत आहे.



