जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बसस्थानक येथे आलेल्या वृद्ध महिलेच्या पिशवीतून सोन्याची पाटली व जुनी पोत असा एकूण ७० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे, याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पुष्पा साहेबराव चौधरी वय-६८, रा. परिजात कॉलनी, जळगाव या वृद्ध महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवारी १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजता वृद्ध महिला या जळगाव शहरातील नवीन बसस्थानकात आलेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या पिशवीतून ७० हजार रुपये किमतीचे सोन्याची पाटली व जुनी सोन्याची पोत असा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना लक्षात आल्यानंतर वृद्ध महिलेने सर्वत्र शोध घेतला, परंतु त्या संदर्भात कोणतेही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नरेश सोनवणे करीत आहे.