नद्यांचे शुद्धीकरण व वृक्षारोपण काळाची गरज – आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज

मुक्ताईनगर प्रतिनिधी | “शरीरातील रक्तवाहिन्यांप्रमाणे देशातील नद्या ह्या शुद्ध स्वच्छ असल्या पाहिजे” असे आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज यांनी कोथळी येथे श्रीमद् भागवत कथा सप्ताहाच्या सहाव्या दिवशी निरूपण करताना सांगितले.

अशुद्ध पाणी नद्यांच्या मध्ये जात असल्याने पवित्रता नष्ट होते व रोगराई पसरते. शरीरातील रक्तवाहिन्यांप्रमाणे देशातील नद्या ह्या शुद्ध स्वच्छ असल्या पाहिजे असे आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज यांनी कोथळी येथे श्री संत आदिशक्ती मुक्ताई अंतर्धान सप्तशती रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त श्रीमद् भागवत कथा व नाम संकीर्तन सप्ताहाच्या सहाव्या दिवशी निरूपण करताना सांगितले. भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रात हाच संदेश दिला आहे त्यामुळे आपण सर्व संत महंतांनी कथा प्रवचनाद्वारे प्रकृती रक्षणाचे प्रबोधन करावे असे आवाहनही त्यांनी केले.

गरिबी श्रीमंतीचा विचार न करता प्रेमाने निष्कपट भावाने सर्वांनी एकत्र यावे असे सांगून भक्त सुदामा यांच्या चरित्रातून मैत्री व प्रेमाचा संदेशही त्यांनी दिला. या भागवत कथेचे समापन ग्रंथपूजन आरती व भव्य ग्रंथ दिंडी काढून करण्यात आले. समारोप दिनांक 27 रोजी सकाळी आठ वाजता काल्याच्या कीर्तनाने वसंत संमेलनाचे आयोजन करून होणार आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहनही महाराजांनी केले.

अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, सर्व संप्रदाय एक असून सर्व जातीधर्माच्या संतांनी एकत्र येण्याच्या उद्देशाने सनातन सतपंथ परिवाराने कोथळी येथील श्री संत आदिशक्ती मुक्ताईच्या प्रांगणात भागवत व नाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन केले. मी कोण आहे ? हे समजण्यासाठी कथा कीर्तनाची आवश्यकता आहे. स्वतःची ओळख झाली की मनात कुणाचाही द्वेष राहात नाही. द्वैत संपून अद्वैत भाव निर्माण होतो. भेदाभेद संपतात.

रात्रीच्या कीर्तनात ह भ प संजय जी महाराज पाचपोर यांनी या संतांचे आचरण शुद्ध आहे जे अद्वेश्टा आहेत, निर्मळ आहेत जे सर्वांना आपले मानतात त्यांच्यातच आपण देवाला बघितले पाहिजे असे सांगून संतांचा उपदेश जीवनात धारण केला पाहिजे तसेच आपण आपल्या आयुष्याच्या कल्याणासाठी सत्संग करावा असा मौलिक संदेश दिला. या भागवत कथेच्या प्रसंगी सभा मंडपात मुक्ताई संस्थान चे अध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, मुक्ताई मतदार संघाचे आ.चंद्रकांत पाटील, श्रीकांत महाजन, निवृत्ती पाटील, समाधान महाराज, विशाल महाराज , श्याम महाराज, रवींद्र हरणे महाराज, नितीन महाराज आदी. उपस्थितांचे महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी यांनी आदिशक्ती मुक्ताई यांची प्रतिमा देऊन स्वागत केले. आदिशक्ती मुक्ताई यांच्या दरबारात श्रीमद् भागवत कथेची सेवा करून मी धन्य झालो असे म्हणत आचार्य अमृताश्रम स्वामी यांनी आनंद व्यक्त केला.

Protected Content