महिलांनी आर्थिक सबलीकरणाच्या संधी शोधण्याची गरज – आ. पाटील

पाचोरा प्रतिनिधी । प्रत्येक वेळी नशीब मदत करेल या गैरसमजात न पडता महिलांनी आर्थिक सबलीकरणाच्या संधी शोधण्याची गरज आहे. असे प्रतिपादन आ. किशोर पाटील यांनी नगरदेवळा येथील सामूहिक रक्षाबंधन सोहळ्यात केले.

दि. २२ रोजी गावात राष्ट्रवादी युवती तालुका प्रमुख अभिलाषा रोकडे व उमेद महिला (बचत गट) अभियानाच्या अंजली चौहान यांच्या माध्यमातून सामूहिक रक्षाबंधन सोहळ्याचा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. 

त्यावेळी पाचोरा-भडगाव चे आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, जिल्हापरिषदेचे गटनेते रावसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक किसनराव पाटील, पंचायत समिती सदस्या मंगलाताई पवार, शिवणारायन जाधव, नगरसेवक विकास पाटील, पीपल्स बँक संचालक अविनाश कुडे, उपसरपंच विलास पाटील आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सर्वांनी या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. माजी आमदार दिलीप वाघ यांचा वाढदिवस असल्याने त्यांचाही आमदार व आयोजकांतर्फे सत्कार करण्यात आला त्यांनीही आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाचे कौतुक केले. आमदार किशोर पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, नुसतं घरकाम करणे ही महिलांची जबाबदारी नसून प्रत्येक क्षेत्रात महिलांना आरक्षण मिळत आहे. त्यामुळं महिला एकत्रित आल्या तर  महिलांमध्ये असणारे संवादकौशल्य, वेळेचे नियोजन, अर्थकारणाची सांगड, जबाबदारीची जाणीव, परिस्थिती हाताळण्याची कला, विविध स्वयंरोजगार व सामाजिक उपक्रम राबवून महिला आपले कर्तव्य सिद्ध करू शकतात. यासाठी सर्वतोपरी साहाय्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रमुख पाहुण्यासह ग्रामपंचायत सदस्य, पोलीस बांधव, वैद्यकीय, विजवीतरण, पत्रकार, शिक्षक व विविध क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी यांना औक्षण करून राखी बांधण्यात आली. त्यावेळी जवळपास दोनशे महिलांनी सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे आमदार किशोर पाटील यांच्या तर्फे रक्षाबंधन भेट म्हणून सर्व महिलांना साडीचा आहेर देण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अभिलाषा रोकडे, अंजली चौहान व त्यांच्या सहकारी यांनी परिश्रम घेतले. तर सूत्रसंचालन जी. यु. पवार यांनी केले.

Protected Content