पाचोरा प्रतिनिधी । रेल्वेच्या भुयारी मार्गामध्ये कालच्या पावसामुळे तलावाचा आकार बदलला असून आज सकाळी या भुयारी मार्गात 3 ते 4 फूट पाणी जमा झाले होते. परिणामी, नागरिकांना जीव धोक्यात घालून भुयारी मार्ग पार करावा लागला. त्यामुळे शहरातील जनता महापालिका प्रशासनावर नाराजीचे सूर उमटत आहे.
काल मध्यरात्री पासुन पाचोरा शहरासह परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भडगाव रोड कडुन शहरास जोडणाऱ्या रेल्वे भुयारी मार्गात नेहमी प्रमाणे आजही तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. नगर पालिका प्रशासनाने या भुयारी मार्गाच्या ठिकाणी पाणी काढण्यासाठी इलेक्ट्रीक मोटारी बसविलेल्या असतांना देखील इतका प्रमाणात भुयारी मार्गात पाणी साचतेच कसे ? याबाबत देखील शहरवासीयांमध्ये उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान भुयारी मार्गात साचलेल्या पाण्यामुळे शहरावासियांना नाईलाजास्तव रेल्वे उड्डाणपूलाचा वापर करत शहरात जावे लागत आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये न. पा. प्रशासना विरुध्द प्रचंड प्रमाणात नाराजीचा सूर दिसुन येत आहे.