निफाड, वृत्तसेवा | भारतासारख्या अन्नधान्याची निर्यात करणाऱ्या देशासाठी नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तानातही भारतातील मुलांपेक्षा अधिक अन्न मिळतं, ही बातमी चांगली आहे का?, असा प्रश्न उपस्थित करत सध्याच्या भाजप सरकारच्या काळात जागतिक पातळीवर देशाची सर्वाधिक बेइज्जती झाली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केला आहे.
निफाड मतदारसंघातील उमेदवार दिलीप बनकर यांच्या प्रचारासाठी पवार यांची पिंपळगाव येथे सभा झाली. या सभेत बोलताना पवारांनी राज्य, केंद्र सरकार व भाजपवर जोरदार हल्ला चढवला. देशाचे पंतप्रधान वा त्यांच्या मंत्रिमंडळातील अन्य मंत्री भारतात आणि भारताबाहेरही दौरे करत असतात. अर्थात ते परदेशात जाऊन जे बोलतात ती देशाची भूमिका असते, असे नमूद करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अमेरिकेत जाऊन केलेल्या विधानावर पवारांनी आक्षेप नोंदवला. भारताची अर्थव्यवस्था माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि रिझर्व्ह बँकेच्या तत्कालीन गव्हर्नरांमुळे डबघाईला आली आहे, असं विधान सीतारामन यांनी अमेरिकेत जाऊन करणे योग्य नाही, असे सांगतानाच परदेशात जाऊन देशातील महत्त्वाच्या व्यक्तींबद्दल टीकाटिपण्णी करायची नाही, इतकीही जाण तुम्हाला नाही का?, असा सवाल पवारांनी केला. पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेचा मान त्यांनी व आम्हीही ठेवला पाहिजे, असेही पवार पुढे म्हणाले.दिल्ली काँग्रेस मुख्यालयावर धाड टाकण्यात आली. कार्यालयातील चार जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. अशाच प्रकारे मलाही त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. निवडणुका आल्या की हे प्रकार सुरू होतात. राज्य चालवायची ही कोणती पद्धत?, असा सवाल पवार यांनी केला. आज कोण कुणाच्या ओळखीचा आहे, इतक्या क्षुल्लक कारणावरून गुन्हे दाखल केले जात आहेत, असे नमूद करताना सत्ता येते आणि जाते पण सत्ता हातात असताना पाय जमिनीवर ठेवायचे असतात आणि डोकं जाग्यावर ठेवायचं असतं, याचं भान ठेवा, असा सल्ला पवारांनी भाजपला दिला. राज्यात शेतकऱ्यांची दैना झाली आहे, शेतकरी आत्महत्या दिवसागणिक वाढताहेत, कारखाने आजारी पडले आहेत. मंदिचे संकट आले आहे. लोकांची रोजीरोटी जात आहे. सगळ्याबाजूने महाराष्ट्र संकटात सापडला आहे. या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढायचे असेल तर परिवर्तनाशिवाय पर्याय नाही, असे आवाहन पवार यांनी केले.