मनसेचे देशपांडे, धुरी यांना अटकपूर्व जामीन मंजूर

मुंबई, लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्ह्यात अटीसह अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंगे काढा अन्यथा लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मनसे कार्यकर्त्यांकडून असे प्रयत्न होत असताना मनसे कार्यकर्त्यांना पोलीसांकडून ठिकठिकाणी ताब्यात घेतले जात होते.

दरम्यान संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी शिवतीर्थवर आले होते. भेट घेऊन बाहेर आल्यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधतानाच पोलिस त्यांना ताब्यात गेले त्यावेळी देशपांडे, धुरी यांची पोलिसांशी झटापट झाली. यावेळी ते तेव्हा इनोव्हा गाडीतून पळून जात असताना महिला कॉन्स्टेबलला धक्का लागून जमिनीवर पडल्याने जखमी झाल्या. तर पोलीस उपनिरीक्षक कासार यांच्या पायावरून गाडी गेली. यावरून देशपांडे आणि धुरी यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ३५३ चा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून देशपांडे, धुरी दोघेही पसार होते.

न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या संतोष साळवी आणि देशपांडे यांच्या गाडीच्या चालकाला जामीन मंजूर करण्यात आला. यासोबतच संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना देखील अटकपूर्व जामीन मंजूर करताना चार्जशीट दाखल होत नाही, तोपर्यंत पोलीस स्थानकात हजेरी लावणे या अटींचे पालन करावे लागणार असल्याचे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटले आहे. आणि जर या अटीचं उल्लंघन करण्यात आले तर जामीन रद्द करण्यासाठी पोलीसांकडून पुन्हा अर्ज केला जाऊ शकतो असेही घरत यांनी म्हटले आहे.

Protected Content