महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत!


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । महाराष्ट्र विधिमंडळाचं बहुप्रतीक्षित पावसाळी अधिवेशन येत्या ३० जूनपासून सुरू होऊन १८ जुलै या कालावधीत मुंबईत पार पडणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. आज विधानभवन येथे झालेल्या विधानमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विधान परिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह विधानसभा सदस्य दीपक केसरकर, भास्कर जाधव, नितीन राऊत, जितेंद्र आव्हाड, अमीन पटेल आणि विधानपरिषद सदस्य भाई जगताप, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत अधिवेशनाच्या संपूर्ण नियोजनावर सखोल चर्चा करण्यात आली. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी यावेळी कामकाजाची सविस्तर माहिती सादर केली. हे अधिवेशन विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा आणि निर्णय घेण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.