अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पळविले; फैजपूर पोलीसात गुन्हा

फैजपूर ता. यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील एका गावातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.  याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

फैजपूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २६ जानेवारी रोजी सकाळी मी पेपर देवून येते असे सांगून अल्पवयीन मुलगी ही घरातून बाहेर गेली. त्यानंतर ती सायंकाळपर्यंत घरी परतली नव्हती. त्यामुळे तिचे पालक चिंतेत होते. अल्पवयीन मुलीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कुठेही यांची माहिती मिळाली नाही. अल्पवयीन मुलीच्या वडीलांनी गुरूवारी २७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेश बऱ्हाटे करीत आहे.

Protected Content