सैन्य भरतीचं आमिष; हिंगोणा येथील शेतकऱ्याची १ लाखात फसवणूक

फैजपूर ता. यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील हिंगोणा येथील शेतकऱ्याला मुलाला सैन्यात लावून देण्याचे आमिष दाखवत १ लाख रूपयांत फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तीन जणांवर फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील  हिंगाणी येथील शेतकरी शांताराम मांगो तायडे (वय-५२) हे शेती करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. त्याचा मुलगा गौरव याला सैन्यात लावून देण्याचे आमिष दाखवत संशयित आरोपी केतन मधुकर पाटील, मधुकर पाटील, शोभाबाई मधूकर पाटील सर्व रा. न्हावी ता. यावल जि.जळगाव यांनी ३ लाख रूपयांची मागणी केली होती. शेतकरी शांताराम तायडे यांच्याकडून ३० मे २०२० रोजी १ लाख रूपये आडव्हॉन्स म्हणून दिले सोबत मुलगा गौरवचे १२ वी पास झाल्याचे कागदपत्र आणि दोन फोटो दिले होते. दरम्यान आजपर्यंत कोणतेही काम न झाल्याने शेतकरी शांताराम तायडे यांनी पैश्यांची मागणी केली असता संशयित आरोपी केतन पाटील यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर शिवीगाळ करून, ‘तुमच्याकडे काय लेखी पुराव आहे का, तुम्ही कोठेही जा, काहीही होणार नाही असे बोलून जातीवाचक शिवीगाळ आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात शेतकरी शांताराम तायडे यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी केतन मधुकर पाटील, मधुकर पाटील, शोभाबाई मधूकर पाटील सर्व रा. न्हावी ता. यावल जि.जळगाव यांच्या विरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे करीत आहे.

Protected Content