जळगाव प्रतिनिधी । नोकरीला लावून देतो असे सांगून दोन जणांकडून सुमारे ६ लाख ४० हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील संशयित आरोपीला धुळे जिल्ह्यातील साक्री येथून अटक केली आहे.
सविस्तर माहिती अशी की, वाल्मिक सुरेश पाटील रा. जळगाव आणि वंदना सचिन बुचडे (वय-३१) रा. जोशी पेठ ह.मु. मुलुंड मुंबई यांची धुळे जिल्ह्यातील साक्री येथील दिपक बापु जाधव याच्याशी एप्रिल २०१७ मध्ये ओळख झाली. आपली सरकारी अधिकाऱ्यांशी ओळख आहे. असे सांगून नोकरी लावून देण्याचे आमिष दिले. नोकरी लागेल या आशेवर वाल्मिक पाटील आणि वंदना बुचडे यांनी १० एप्रिल २०१७ ते २३ ऑक्टोबर २०१८ दरम्यान वेळोवेळी संशयित दिपक जाधव याने पैश्यांची मागणी केली. मागणीनुसार वाल्मिक पाटील यांच्या खात्यातून एकुण ६ लाख ४० हजार १०० रूपये ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले. तरी देखील नोकरी लावून दिली नाही. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संशयित आरोपी दिपक जाधव याला पैसे परत करण्याचा तगादा लावला. अजूनपर्यंत एकही पैसा परत केला नाही. याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात वंदना बुचडे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी दिपक जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे करीत आहे.