यावल शहरात साफसफाई करण्याची मनसेची मागणी; मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

यावल, प्रतिनिधी । शहरातील विविध भागात साफसफाई होत नसल्याची ओरड होत आहे. नगरपालिका प्रशासनाने येत्या आठ दिवसात शहरातील साफसफाई करण्यात यावी अन्यथा नगरपालिकेसमोर कचरा आणून टाकू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने देण्यात आला आहे. यासंदर्भात नगरपालिकेला निवेदन देण्यात आले आहे.

भुसावळ रोड, फालक नगर, गंगा नगर, जे टी महाजन संकुल, मेन रोड या भागात वेळेवर साफसफाई होत. शहरातील नाले सफाई या वर्षी करण्यात आलेली नाही, आताची परिस्थिती पाहता ५ टक्क्यांपेक्षा अधिक नालेसफाई झाली नाही. मे महिन्याची २५ तारीख ओलांडूनही, पावसाळा तोंडावर आलेला आहे असे असतांनाही नालेसफाई होत नसेल तर याची जबाबदारी कोणाची? त्याच ठेकेदारांना ठेके देऊन प्रशासन आपले उखळ पांढरे करून घेत आहे. प्रशासन आणि ठेकेदारांची टक्केवारी ठरलेली आहे त्यामुळेच नालेसफाई होतांना दिसत नाही. पावसाळा तोंडावर आला असतांना कोरोना संकटामुळे यंदाही कामे होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे यावल शहरात अडचण निर्माण झाल्यास तर शहरातील नागरिकांना पावसाळ्यात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. आम्ही मनसेतर्फे शहरातील नालेसफाईची पाहणी केली. या पाहणीमध्ये शहरातील काही भागात नालेसफाई योग्य पद्धतीने केली नसल्याचे दिसून आले आहे. नाल्यांमध्ये (गटार) गाळ कचरा तसाच असून नाले गाळमुक्त न केल्याने पावसाळ्यात शहरात पाणी भरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसात नालेसफाई पूर्ण केली नाही तर नगरपालिकासमोर कचरा आणून टाकू याची सर्व जबाबदारी नगरपालिका यावल व आरोग्य अधिकाऱ्यांची राहील, याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी, याबाबतचे निवेदन दिले आहे.

निवेदन देतांना जिल्हाध्यक्ष चेतन आढळकर, तालुका उपाध्यक्ष शाम पवार, शहराध्यक्ष किशोर नन्नवरे, विद्यार्थी सेना गौरव कोळी, विभागाध्यक्ष आबीद कच्छी, विपुल येवले, प्रतीक येवले, गोविंदा सुतार, राहुल सुतार आदी उपस्थित होते.

Protected Content