शिवसेनेतून आलेल्यांना उमेदवारी दिल्याने निष्ठावंत मनसे नेत्याने पक्ष सोडला

0manase 3 0

मुंबई, वृत्तसंस्था | मनसे काही दिवसांपूर्वीपर्यंत विधानसभा निवडणूक लढणार की नाही ? याबाबत संभ्रम असताना राज ठाकरे यांनी निवडणूक लढण्याचे जाहीर करत उमेदवार यादी जाहीर केल्याने कार्यकर्त्यांनी तयारी सुरु केली. मात्र राज ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे अनिल मटाले यांनी अचानक पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

 

राज ठाकरे यांनी नाशिकमधून दिलीप दातीर यांना उमेदवारी जाहीर केली असल्याने नाराज झालेल्या अनिल मटाले यांनी आपला राजीनामा दिला आहे. अनिल मटाले नाशिक पश्चिममधून निवडणूक लढण्यास उत्सुक होते. पण शिवसेनेतून प्रवेश केलेल्या दिलीप दातीर यांना उमेदवारी देण्यात आल्याने नाराज अनिल मटाले यांनी नाशिक मनसे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला आहे.

राजीनामा देताना अनिल मटाले यांनी पत्रात लिहिले आहे की, ‘मी गेल्या २३ वर्षांपासून आपल्यासोबत काम करत आलो आहे. या २३ वर्षांमध्ये विद्यार्थी संघटनेचा जिल्हाध्यक्ष, नगसेवक, गटनेता मनसे मनपा ते नाशिक शहराध्यक्ष पदापर्यंत आपल्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. या २३ वर्षात आपल्याकडून खूप काही शिकायला मिळाले. सदस्यत्वाचा आणि शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे’.

सोमवारी राज ठाकरेंच्या उपस्थितीत धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी मनसेत प्रवेश केला. राज ठाकरे यांनी नरेंद्र पाटील पक्षातर्फे निवडणूक लढतील, अशी घोषणा केली. शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन करत आत्महत्या केली होती. नरेंद्र पाटील यांच्यासोबत शिवसेनेचे नाशिकचे नगरसेवक दिलीप दातीर यांनीही मनसेत प्रवेश केला होता. ते ही मनसेतर्फे निवडणूक लढणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

Protected Content