‘त्या’ राजकारण करणाऱ्यांची उडी फसली – राऊत

कोल्हापूर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । “ज्यांनी संभाजीराजे छत्रपतींना पुढे करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्यांची उडी फसली आहे,” असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. ते कोल्हापूरात  बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “छत्रपती शाहू महाराज केवळ महाराष्ट्रासाठी नाही, तर देशासाठी आदरणीय आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि सध्याच्या शाहू महाराजांचे अत्यंत जिव्हाळ्याचे, कौटुंबिक संबंध होते आणि आजही आहेत. काल त्यांनी जी भूमिका घेतली त्यानंतर मी इतकंच म्हणालो की कोल्हापूरच्या मातीत आजही प्रामाणिकपणा सत्य जीवंत आहे. शाहू घराण्याने आपली सत्यवादी परंपरा जीवंत ठेवली.  संभाजीराजेंविषयी प्रेम आहे. आम्हाला वादातून राजकारण करायचं नाही. ज्यांनी संभाजीराजेंना पुढे करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्यांची उडी फसलेली आहे. त्यांनी उडी मारण्याचा प्रयत्न केला, मात्र, शाहू महाराजांनी भूमिका घेतली त्याने त्यांची उडी फसली,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

“शिवसेनेचं मन साफ आहे, शिवसेना कधीही पाठीमागून वार करत नाही. शिवसेनेने आधीही भूमिका स्पष्ट केली होती की शिवसेनेच्या दोन जागा आहेत. राज्यसभेत जायचं असेल तर तुम्ही शिवसेनेची उमेदवारी घ्यावी. आम्ही तुम्हाला आमची मतं देऊ,” असंही राऊतांनी नमूद केलं. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या फुटीवर बोलताना संजय राऊत म्हणाले, “मी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कान टोचले नाही. समिती ज्या पद्धतीने फुटतीय, विस्कळीत होतेय त्यामुळे त्या भागातील मराठी माणसाची एकजुट अडचणीत आहे आणि त्याचा फटका फक्त बेळगावला नाही, तर सातारा, सांगली, कोल्हापूर या भागालाही बसतोय. तेथेही अडचणी निर्माण होत आहेत.”

 

Protected Content