फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पुढाकाराने येथील पत्रकारांनी सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली.
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे राज्यातील विविध जिल्ह्यांतील, तालुक्यातील पत्रकारांना विधिमंडळाच्या अधिवेशनाचे कामकाज दाखविण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून जळगांव जिल्ह्यातील फैजपूर येथील पत्रकारांनी मुंबई येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाची माहिती घेतली. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी आपल्या संपूर्ण कार्यकारिणी समवेत फैजपूर येथील पत्रकारांचे स्वागत व सत्कार केला.
यावेळी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक तथा ज्येष्ठ पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी यांनी फैजपूर कॉंग्रेसच्या अधिवेशनाची आठवण सांगून इतिहासाची विस्मृती होता कामा नये, इतिहासाचा धांडोळा घेऊनच पुढे वाटचाल केली पाहिजे, असे प्रतिपादन केले. ते म्हणाले की, १९३६ साली धनाजी नाना चौधरी यांनी जळगांव जिल्ह्यातील फैजपूर येथे कॉंग्रेसचे अधिवेशन घेतले होते. या ऐतिहासिक अधिवेशनात महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित मदनमोहन मालवीय, डॉ. राजेंद्र प्रसाद, विजयालक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू, आचार्य नरेंद्र देव यांच्या पासून परमपूज्य साने गुरुजी यांच्या पर्यंत दिग्गज नेते उपस्थित होते. या फैजपूर कॉंग्रेसच्या अधिवेशनाची आठवण धनाजी नाना चौधरी यांचे सुपूत्र आणि महाराष्ट्र विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष बाळासाहेब मधुकरराव धनाजी चौधरी यांनी ठेवली आणि या फैजपूर कॉंग्रेसच्या अधिवेशनाचा अमृत महोत्सव २०११ साली होतांना बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांचे सुपूत्र तत्कालीन आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांनी एक संस्मरणीय दिनदर्शिका प्रकाशित केली.
योगेश त्रिवेदी पुढे म्हणाले की, या स्मरणिकेमध्ये महात्मा गांधी यांच्या पासून नरहरी गाडगीळ, केशवराव जेधे, साने गुरुजी यांच्या पर्यंत सर्वांच्या स्वाक्षर्या प्रसिद्ध केल्या. हे एक पान सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. त्याचा ’बठ्ठा आठेच शेतस’(म्हणजे सगळे इथेच आहेत) या अहिराणी भाषेतील शीर्षकाखाली मी दैनिक सामना मध्ये लेख लिहिला होता. हे अधिवेशन शिरीष चौधरी यांनी अजरामर केले, अशा योगेश वसंत त्रिवेदी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
या कार्यक्रमास मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, उपाध्यक्ष महेश पवार, कार्यवाह प्रवीण पुरो, कार्यकारिणी सदस्य कमलाकर वाणी, खंडुराज गायकवाड, भगवान परब तसेच फैजपूर येथील पत्रकार संस्था अध्यक्ष फारुख शेख अमीर जेष्ठ पत्रकार अरुण होले, राजेंद्र तायडे,सलीम पिंजारी, राजु तडवी, संजय सराफ, मयुर मेढे, किरण पाटील, गोपीचंद सुरवाडे, संतोष कुल्थे, जफर शेख, अरबाज रवान, मोहसीन शेख,नजमोददीन शेख, कमलाकर माळी, प्रभाकर तायडे आदी उपस्थित होते.