यावल तालुक्यातील उसाचे पंचनामे करा : शेतकऱ्यांची मागणी

यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मुक्ताई कारखान्याकडून उसतोड गाळपाअभावी शिल्लक राहील्याने तालुक्यातील उस उत्पादक आर्थिक संकटात सापडले  असून प्रशासनाने तात्काळ उसाचे पंचनामे करावे अशा मागणीचे निवेदन उस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार महेश पवार यांना देण्यात आले आहे.

 

मुक्ताईनगर येथील मुक्ताई शुगर्स कारखान्याव्दारे यावल तालुक्यातील शेतकरी बांधवांनी उसाची लागवड केलेली आहे. मात्र आता मुक्ताई साखर कारखान्यांकडुन सदर लागवडीचे उस तोडण्यास नकार दिल्याने उस उत्पादक शेतकरी हा मोठया आर्थिक अडचणीत आला आहे. कारखान्याकडून  उसाची लागवड व नंतर नोंद करण्यात आल्यावर देखील उसतोड न करणे या गोंधळलेल्या मुक्ताई शुगर्स कारखान्याच्या कारभारामुळे गाळपाअभावी यावल तालुक्यातील उस उत्पादक शेतकरी यांच्या लाखो रुपयांचे मोठे नुकसान होणार आहे. या उसतोडीच्या गोंधळात शेतकरी हा मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. तरी महसुल प्रशासनाच्या वतीने तात्काळ तालुक्यातील विविध गावातील तलाठी यांना आपआपल्या क्षेत्रातील उसाचे स्वतंत्र पंचनामे करण्याचे आदेश द्यावे व त्या पंचनाम्याची प्रत प्रत्येक उस उत्पादक शेतकऱ्याला द्यावी अशी मागणी यावलचे तहसीलदार महेश पवार यांच्याकडे यावल पंचायत समितीचे माजी सदस्य शेखर सोपान पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रेमचंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठया संख्येत तालुक्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

Protected Content