शेतकऱ्यांच्या ह‍िताला व जिल्ह्याच्या सर्वसमावेशक व‍िकासाला सर्वोच्च प्राधान्य – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शेतकरी, वंच‍ित, दुर्लक्ष‍ित घटक, सर्वसामान्य नागर‍िक यांच्या जीवनात शासकीय योजना व मदतीच्या रूपाने नवी पहाट आणण्याचे काम शासन करत आहे. ‍ज‍िल्ह्यात पायाभूत सुव‍िधांचे जाळे न‍िर्माण करण्यात येत आहे. यापुढेही शेतकऱ्यांच्या ह‍िताला व जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासाला सर्वोच्च प्राधान्य राहणार असल्याची ग्वाही स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे द‍िली.

भारतीय प्रजासत्ताक द‍िनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी शुभेच्छा संदेशात पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर जिल्हाधिकारी अंकुश प‍िनाटे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, प्रांतध‍िकारी महेश सुधळकर, तहसीलदार नामदेव पाटील तसेच विविध विभागाचे विभागप्रमुख तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, जिल्ह्यात 2022 व 2023 या वर्षात नैसर्ग‍िक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या 89 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 83 कोटींची नुकसान भरपाई , चालू वर्षाच्या खरीप हंगामामध्ये 7 तालुक्यातील 27 महसूल मंडळात 21 दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडल्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील 1 लाख 43 हजार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर 76 कोटी 40 लाखांची विमा भरपाई , सन 2022 – 23 या वर्षात 80 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 48 कोटी 45 लाखांची पीक विमा रक्कम वर्ग करण्यात आली आहे. पुनर्च‍ित हवामानावर आधारीत फळपीक विमा योजने अंतर्गत 44 हजार शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात 325 कोटी 90 लाखांचा पीक विमा वर्ग करण्यात आला आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर चलीत औजारांसाठी 1 हजार 698 लाभार्थ्यांना 13 कोटी 98 लाखांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांना पीक कर्ज व अनुदानाचे वाटप

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, जळगांव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून चालू वर्षात 1 लाख 77 हजार शेतकऱ्यांना 871 कोटी 69 लाखांचे खरीप पीक कर्ज वाटप झाले असून मागील वर्षाच्या तुलनेत चालू आर्थ‍िक वर्षात जवळपास 26 टक्क्यांनी जास्त आहे. “छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान” योजनेत जिल्ह्यातील 2 लाख शेतकऱ्यांना 799 कोटी 53 लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 1 लाख 61 हजार शेतकऱ्यांना 921 कोटी 61 लाखांच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला असून 56 हजार शेतकऱ्यांना 212 कोटी 36 लाखांचे प्रोत्साहनपर अनुदान वितरित करण्यात आले आहे.

सामाज‍िक न्यायाला प्राधान्य

गरीब, गरजू, वंचितांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा लाभ देण्यात येत आहेत. जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या एकूण 901 वस्त्यांच्या विकासासाठी 40 कोटींचा निधी वितरित करण्यात आला. यातील 295 कामे प्रगतीपथावर आहेत. जिल्ह्यातील 24 हजार मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व फ्री – शीप योजनेचा लाभ देण्यात आला. वसतिगृहाबाहेर राहून शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या एक हजार विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत 2 कोटी 25 लाख रूपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. जिल्ह्यातील 80 लाभार्थ्यांना गटई स्टॉलचे वाटप करण्यात आले. रमाई घरकुल योजनेत ग्रामीण व शहरी भागात 2 हजार 500 घरकुलांचा लाभ मंजूर करण्यात आला. यासाठी 32 कोटींचा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या माध्यमातून धनगर समाजातील व वि.जा.भ.ज. प्रवर्गातील बाराशे लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ मंजूर करण्यात आला असून त्यासाठी 14 कोटी 89 लाखांचा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे. असे याप्रसंगी पालकमंत्र्यांनी सांग‍ितले.

ज‍िल्हा न‍ियोजनातून व‍िकासकामे

जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण काम करण्यात येत आहे. डिसेंबर 2023 अखेर जिल्हा वार्ष‍िक योजनेच्या खर्चात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम क्रमाकांवर आहे. चालू आर्थ‍िक वर्षात 592 कोटींच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या असून 318 कोटी रूपये विकास योजनांसाठी खर्च झाले आहेत. यामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पुतळा बसविणे, वारकरी भवन, महिला व बालविकास भवन इमारत, जिल्हा रूग्णालयासाठी 25 नवीन रूग्णवाहिका, रामानंद नगर व पाळधी पोलीस ठाण्याच्या इमारतीचे बांधकाम, भूमी अभिलेख विभागासाठी नवीन 15 रोव्हर मशीन खरेदी करणे, जिल्हा कृत्रीम रेतन केंद्र इमारतीचे बांधकाम या विशेष कामांचा समावेश आहे. त्याशिवाय जिल्हा रूग्णालयातील विशेष नवजात शिशु काळजी कक्षात 5 कोटी 57 लाख रूपये खर्चून अत्याधुनिक यंत्रसामग्री बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. नवजात बालकांसाठी व्यापक स्तनपान व्यवस्थापन केंद्र मदर मिल्क बँक स्थापन करण्यात येत आहे. अशी माह‍िती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी द‍िली.

अनुसूच‍ित जाती उपयोजना व आद‍िवासी घटक कार्यक्रमात ज‍िल्हा राज्यात अव्वल

जिल्हा वार्ष‍िक योजनेत अनुसूचित जाती उपयोजनेत 92 कोटीपैकी 46 कोटी निधी खर्च झाला आहे. निधी खर्चात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. जिल्हा वार्ष‍िक आदिवासी घटक कार्यक्रम अंतर्गत 2023-24 या आर्थ‍िक वर्षात अर्थसंकल्पीत निधीशी खर्चाची टक्केवारी 97 टक्के असून निधी खर्चामध्ये आदिवासी यावल प्रकल्प कार्यालय राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. असे ही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.

जलजीवन म‍िशन

जलजीवन मिशन जिल्ह्यात आकार घेत आहे. जळगाव जिल्हा परिषदेतर्फे 1 हजार 359 योजना राबविल्या जात असून 1 हजार 240 कोटी रूपये निधी उपलब्ध करण्यात आला आहे. यातून ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला 55 लीटर पाणी उपलब्ध होणार आहे. असल्याचा व‍िश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

289 मेगावॅट सौर वीजेची निर्मिती होणार

जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत 289 मेगावॉट विजेची निर्मिती होणार असून जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून 291 नवीन ट्रान्सफार्मर मंजूर केले आहेत. त्यासाठी 30 कोटीचा निधी महावितरणाला वर्ग करण्यात आला आहे. अशी माह‍िती पालकमंत्र्यांनी यावेळी द‍िली.

अमळनेर साहित्य संमेलन व महासंस्कृती महोत्सव रस‍िकांसाठी पर्वणी

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले की, अमळनेर येथे 72 वर्षाच्या कालखंडानंतर होणारे 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपल्या जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. 2 ते 4 फेब्रुवारी 2024 दरम्यान होणाऱ्या या साहित्य संमेलनाचा रसिकांनी अवश्य लाभ घ्यावा. फेबुवारी 2024 महिन्यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने जळगाव शहरात “महासंस्कृती महोत्सव” आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवात पाच दिवस जळगावकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे.

तरूणांनी मतदार नोंदणी करावी

निवडणूक विभागाने राबविलेल्या मतदार यादीच्या संक्ष‍िप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमांमुळे जिल्ह्यात 34 हजार नवीन मतदार वाढले आहेत. मतदार यादी नाव नोंदविण्याची प्रक्रिया ऑनलाईन सुरू असून 18 वर्षावरील तरूणांनी मतदार यादीत आपले नाव नोंदविण्यासाठी पुढाकार घ्यावा. असे आवाहन ही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पोलीस दल, होमगार्ड, अग्निशमन दल, पोलीस बॅन्ड पथक, डॉग युनिट यासह ज‍िल्ह्यातील व‍िव‍िध शाळांमधील 20 पथकांनी संचलन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हर्षल पाटील व देव‍िदास वाघ यांनी केले.

ध्वजारोहण व भाषणानंतर पालकमंत्र्यांनी उपस्थ‍ित ज्येष्ठ नागर‍िक, स्वातंत्र्यसैन‍िक, मह‍िला, व‍िद्यार्थी व सर्वसामान्य नागर‍िकांशी संवाद साधला.

Protected Content