आता जो निर्णय घेऊ तो शासनाला परवडणार नाही ; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

 

 

 सोलापूर  : वृत्तसंस्था । ‘मराठा आरक्षणावर खेळ नको. आम्ही आता जो निर्णय घेऊ तो शासनाला परवडणारा नाही. मराठा आरक्षणाची दखल घेतली नाही तर कोणतेही सरकार महाराष्ट्रावर राज्य करणार नाही, असा सज्जड दम मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तुळजापुरातील  चिंतन बैठकीत देण्यात आला.

 

ही बैठक आज पार पडली. जे आमदार , खासदार मराठा समाजाला मदत करीत नाहीत हेटाळणी करतात त्यांना यापुढे विचार करावा लागेल, असा इशाराही यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून देण्यात आलाय.

 

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाची चिंतन बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील विविध समन्वयक उपस्थित होते. जवळपास दोन तास चाललेल्या या बैठकीमध्ये विविध ठराव घेण्यात आले. या ठरावाची अंमलबजावणी कशी करायची, याचा निर्णय उद्या राज्यस्तरीय मेळाव्यात घेण्यात येईल, असं आयोजकांनी यावेळी सांगितले.

 

मराठा समाजाचे अनेक माजी मुख्यमंत्री, आमदार, खासदार असताना मराठा आरक्षणाबाबत समाजावर अन्याय का झाला? हा अन्याय का आणि कोणी केला? याचा शोध उद्याच्या राज्यव्यापी बैठकीत घेतला जाणार आहे. त्याचे पडसाद पुन्हा राज्यभर पाहायला मिळतील, असंही चिंतन बैठकीचे आयोजक सज्जन साळुंके यांनी म्हटलंय. आता मराठा आरक्षणासाठी ठोक मोर्चे निघतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. तुळजापूर येथे झालेल्या बैठकीत सर्वांनी मराठा क्रांती ठोक  मोर्चा च्या टोप्या डोक्यावर घातल्या होत्या. त्यामुळे आगामी काळात मराठा समाज आरक्षणासाठी अधिक आक्रमक होणार असं पाहायला मिळत आहे.

 

मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक सातत्याने आंदोलन करत आहेत. या आंदोलकांनी मूक मोर्चांवर भर दिला होता.  काही मोर्चांना आणि मराठा आंदोलकांनी पुकारलेल्या बंदला हिंसक वळणही लागलं होतं. त्यामुळे अनेक आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. हे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची सातत्याने मागणी होत होती. स्वत: खासदार संभाजी छत्रपती यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती. या आधीच्या गृहमंत्र्यांकडेही त्यांनी ही मागणी केली होती. आज अखेर सरकारने त्यांची मागणी मान्य केली आहे. राज्य सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्याने संभाजी छत्रपती यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. मराठा तरुणांनीही संभाजी छत्रपती यांचे आभार मानले आहेत.

 

Protected Content