मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या राज्य सरकारच्या कर्मचार्यांनी मध्यरात्रीपासून बेमुदत संप सुरू केला असून यामुळे आज मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.
जुन्या पेन्शन योजनाचा मुद्दा आता केंद्रस्थानी आला आहे. या संदर्भात वारंवार इशारे देऊन आणि या प्रकरणी चर्चा होऊन देखील ठोस निर्णय न झाल्यामुळे राज्य सरकारचे कर्मचारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत. राज्य सरकारने या संदर्भात सुकाणू समितीच्या सोबत बैठक घेतली असली तरी यातून तोडगा निघाला नाही.
दरम्यान, आजपासून सुरू झालेल्या संपात १८ लाख कर्मचारी सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. यामुळे राज्य शासनाच्या विविध खात्यांमधील कामकाज आजपासून ठप्प होणार आहे. तर यात तूर्तास सहभागी न होण्याचा निर्णय अ आणि ब श्रेणीतील अधिकार्यांनी घेतला आहे.