राष्ट्रवादीच्या नेत्यांवर शरद पवार नाराज

 

 

मुंबई: वृत्तसंस्था । परमबीर सिंह यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा बचाव करण्यात असमर्थ ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांवर शरद पवार नाराज  आहेत .

 

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनिल देशमुख यांची बाजू व्यवस्थितपणे मांडली नाही. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा डागाळली होती. त्यामुळे शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाराज झाले आहेत.

 

शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकारपरिषद घेऊन अनिल देशमुख यांची बाजू मांडली होती. परमबीर सिंह यांनी आयुक्तपद गेल्यानंतर हे आरोप केले आहेत. ते दिल्लीत जाऊन आल्यानंतर त्यांनी पत्र लिहले. या  गोष्टी संशयास्पद असल्यामुळे अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यायची गरज नाही, असे शरद पवार यांनी ठणकावून सांगितले होते. मात्र, शरद पवार वगळता राष्ट्रवादीचा एकही नेता असा मुद्देसूद प्रतिवाद करु शकला नव्हता. त्यामुळे शरद पवार नेत्यांच्या कामगिरीवर नाराज असल्याचे समजते.

 

 

शरद पवार हे अद्याप अनिल देशमुख यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे असल्याचे दिसत आहे. अनिल देशमुख यांनी न घाबरता सीबीआयच्या चौकशीला सामोरे जावे, असा सल्ला शरद पवार यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

महाविकासआघाडी सरकार आणि अनिल देशमुख यांनी सीबीआय चौकशीच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांनी केलेले आरोप गंभीर असून त्यासाठी स्वतंत्र चौकशी होणे गरजेचे असल्याचे सांगत उच्च न्यायालयाचा निर्णय उचलून धरला होता. त्यामुळे आता अनिल देशमुख यांना सीबीआयच्या चौकशीला सामोरे जाण्याशिवाय गत्यंतर  उरलेले नाही.

Protected Content