नौदलाच्या ध्वजावर शिवरायांच्या राजमुद्रेची छाप !

कोची-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते आज आयएनएस विक्रांत या युध्दनौकेच्या लोकार्पणासह नौदलाच्या नवीन ध्वजाचे अनावरण करण्यात आले. यात समस्त मराठी जनांसाठी अतिशय अभिमानास्पद अशी बाब घडली आहे.

देशाची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील झाली आहे. केरळमधील कोची येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आयएनएस विक्रांत म्हणजे स्वदेशी क्षमता, स्वदेशी संसाधने आणि स्वदेशी कौशल्यांचे प्रतीक आहे. त्याच्या एअरबेसमध्ये बसवलेले स्टीलही स्वदेशी आहे. विक्रांत विशाल आहे, विराट आहे, विहंगम आहे.. विक्रांत विशिष्ट आहे, विक्रांत खासही आहे. विक्रांत ही केवळ युद्धनौका नाही. २१ व्या शतकातील भारताच्या कठोर परिश्रम, प्रतिभा, प्रभाव आणि वचनबद्धतेचा हा पुरावा आहे

दरम्यान, याप्रसंगी नौदलाच्या नव्या ध्वजाचे लोकार्पण करण्यात आले. या ध्वजावर छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची छटा असून त्याचप्रकारे अष्टकोनी पद्धतीचं नौदलाचं चिन्ह या ध्वजावर अंकित करण्यात आलं आहे. याप्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले, सागरी शक्तीच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी असं नौदल उभारलं, ज्याने शत्रूंची झोप उडवली. इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांना भारतीय जहाजांची ताकद आणि त्याद्वारे होणार्‍या व्यापाराच्या ताकदीचा धाक होता. छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने आजपासून नौदलाचा नवा झेंडा समुद्रात आणि आकाशात फडकणार आहे. भारतीय नौदलाच्या झेंड्यावर आतापर्यंत गुलागिरीचं निशाण होतं. पण आज २ सप्टेंबर २०२२ या ऐतिहासिक तारखेला इतिहास बदलून टाकणारं काम आपण केलंय. आज भारताने गुलामगिरीचे ओझं झेंड्यावरुन पुसून टाकले आहे.

Protected Content