पारोळ्यात आदर्श शिक्षकाने केला यशवंत विद्यार्थ्यांचा गौरव

पारोळा प्रतिनिधी । लोकेश चौधरी व पुष्कर देवरे या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल स्वतः त्यांच्याशी संपर्क साधून आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद भावसार यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अभिनंदन पत्र, गौरव पत्र व रोख बक्षीस देऊन सन्मानित केले व शुभेच्छा दिल्या .

याविषयी सविस्तर माहिती अशी की, सदानंद भावसार हे समाजात कुठेही चांगली घटना घडली किवा कुणी चांगले यश संपादन केले असेल तर त्यांना ओळख नसतांनाही अभिनंदनाचे पत्र पाठवून त्यांचा उत्साह द्विगुणीत करतात. या आपल्या सवयीच्या एक पाऊल पुढे जात येथील लोकेश किरण चौधरी याने अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेत ( जेईई ) १३४ गुण मिळवून देशभरातील १.५ लाख विद्यार्थ्यांत एआय्आर् ६३७७ क्रमांकाचे यश संपादन केले तर पुष्कर श्रावण देवरे याने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेत ( नीट ) ७२० पैकी ६१३ गुण मिळवून देशातील १६ लाख विद्यार्थ्यांत एआय्आर् १३,६०८ क्रमांकाचे उत्तुंग यश मिळविले .

दोन्ही विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल येथील गुणग्राहक व्यक्तिमत्व राज्य पुरस्कारप्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अभिनंदन पत्र, गौरव पत्र व रोख बक्षीस देऊन सन्मानित केले आणि पुढील वाटचाल व उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. या सन्मानामुळे त्यांचे पालक व कुटुंबीय यांनी आनंद व्यक्त करुन भावसार यांचे आभार मानले

Protected Content