मलकापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मलकापूर तालुक्यातील दुधलगाव येथील एका तरुणाने कौटुंबिक वादातून दोन महिन्यापासून माहेरी गेलेल्या पत्नीच्या घरी जाऊन पत्नीचा व दहा महिन्याच्या मुलीचा गळा चिरून हत्या केल्यानंतर परत येऊन स्वतःच्या शेतातील असलेल्या विहिरीत आत्महत्या करून जीवन संपविल्याची घटना (ता.१२) रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. घटनेचे वृत्त कळताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मलकापूर ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप काळे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पुढील तपास पो.हे.कॉ. दिलीप तडवी करीत आहे.
तालुक्यातील दुधगाव बु. येथील रहिवासी विशाल मधुकर झनके वय ३० वर्ष याची पत्नी प्रतिभा विशाल झनके हिच्यासोबत काही दिवसांपासून कौटुंबिक वाद निर्माण झाल्याने प्रतिभा ही मुलगी प्रिया वय २ वर्ष व दिव्य वय १० महिने या दोन्ही अपत्यांसह आपल्या माहेरी जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे गत दोन महिन्यांपासून निघून गेली होती. तेव्हा विशाल याने मध्यंतरी अडीच वर्षाची मुलगी प्रिया हिला घरी घेऊन आला. त्यानंतर पत्नीला परत घेऊन येतो असे सांगत आज १२ एप्रिल २४ रोजी फत्तेपूर ता.जामनेर येथे गेला.
पत्नी सोबत झालेल्या वादातून त्याने पत्नीचा व दहा महिन्याची मुलगी दिव्याचा गळा चिरून हत्या केली. त्यानंतर तेथून आपल्या गावी परत येऊन घरी शेतात जातो असल्याचे सांगून, जांभूळधाबा शिवारातील स्वतःच्या शेतात असलेल्या विहिरीत दुपारी १२.३० च्या दरम्यान आत्महत्या केली. विशाल याने विहिरीजवळ आपली मोटरसायकल उभी करून पायातील बूट काढलेले होते. तसेच त्याला पाण्यात पोहता येत असल्याने त्याने स्वतःच्या पायाला दगड बांधून विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याचे समजते.