भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नवरा बायकोचं नातं हे सर्वात जवळचं नातं असतं. जेव्हा दोन व्यक्ती लग्नाच्या बंधनात बांधले जातात तेव्हा ते एकमेकांना प्रत्येक सुख-दु:खात सोबत राहण्याची शपथ घेतात. संपूर्ण आयुष्य एकत्र राहण्याचं वचन एकमेकांना देतात. हेच सातत्य एकत्र राहण्याचे वचन पाळत पत्नीच्या निधनानंतर पतीने जीव सोडल्याची घटना भडगाव तालुक्यातील अंतुर्ली (बुवाची) येथील गुलाबराव शेलार व प्रमिलाबाई शेलार या दाम्पंत्याच्या बाबतीत घडली. अतूट प्रेमाच्या भावनेमुळेच त्यांनी एकत्रितपणे जगातून निरोप घेतल्याची चर्चा मृत्यूनंतर होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील अंतुर्ली (बुवाची) येथील रहीवाशी गुलाबराव भिमराव शेलार हे भारतीय नौदलात उरण (जि.रायगड) येथे कार्यरत होते. त्यांना सेवानिवृत्त होऊन ८ वर्ष झाले होते. त्यानंतर ते कल्याण येथे स्थायिक होते. १३ जुलै रोजी पत्नी प्रमिलाबाई शेलार या घरात पाय घसरून पडल्या. त्यामुळे त्यांना कल्याण येथे दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यानंतर पायाला कच्चा पाटा देण्यात आल्यानंतर दोन दिवसांनी त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला. १५ जुलै रोजी घरी आल्यावर मुलगा वाल्मीक, सुन अश्विनी नातांसह एकत्र जेवण केले. त्यानंतर झोपलेले असतांना रात्री च्या दरम्यान प्रमिलाबाई या पलंगावरून उठल्या अन् त्यांना अचानक चक्कर येऊन बेशुद्ध झाल्या. त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. दरम्यान गुलाबराव शेलार यांची ही तब्येत खराब होती. मात्र पत्नी दवाखान्यात अॅडमिट असल्याने घरी आल्यावर आपण दवाखान्यात दाखल होऊ असे ते मुलाला सांगत होते. मात्र त्यांना जेव्हा पत्नीच्या निधनाची बातमी समजली तेव्हा त्यांचा धीर सुटला. त्यांना ही तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र पत्नी निधनानंतर अवघ्या ११ तासातच त्यांनी ही पत्नी बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.
दोघांची एकत्र अंत्ययात्रा
पत्नींच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतांनाच पतीच्या निधनाची बातमी आल्यावर दोघांची एकत्रितच अंत्ययात्रा काढण्यात आली. दोघांवर कल्याण येथे एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघांची प्रेत पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. दरम्यान आई-वडीलाचा एकाच दिवशी मृत्य झाल्याने एकुलती एक मुलगी, सुरेखा पाटील व मुलगा वाल्मीक शेलार यांचा आक्रोश मन हेलावणारा होता. शेलार हे पत्रकार सुधाकर पाटील यांचे सासु सासरे होते.
विठ्ठलरुख्माईचा अंतिमयात्रेत एकत्रित प्रवास
गुलाबराव शेलार व पत्नी प्रमेलाबाई शेलार यांचे एकमेकांवर अतुट प्रेम होते. ते कुठेही जातांना एकत्रित जायचे. एकमेकांपासून ते कधीही वेगळे राहीले नाही. त्यामुळेच शेवटचा प्रवासही त्यांनी एकत्रीत केल्याचा निर्णय घेतला असावा अशी चर्चा उपस्थितांमधे होती. तर आषाढीच्या पवित्र पर्वात त्यांचा मृत्यु झाल्याने विठ्ठल अन् रुख्माई सारखे एकत्र वैकुंठवासी झाल्याच्या योगायोग यानिमित्ताने पहायला मिळाला. गुलाबराव शेलार (वय-६६) व प्रमिला शेलार (वय-६१) यांच्या एवढ्या वयात ही एकमेकांवर एवढे अतुट प्रेम होते. हे आजच्या पती- पत्नी विभक्त होण्याच्या वाढत्या प्रमाणाच्या जगात आदर्श उदाहरण आहे.